For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

केपे अपघातात 2 ठार, 10 जखमी

12:15 PM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
केपे अपघातात 2 ठार  10 जखमी

तिघांची प्रकृती गंभीर, जखमींमध्ये पाच मुलांचाही समावेश : पुलाच्या कठड्याला धडक देऊन काजुबियांचा ट्रक कोसळला

Advertisement

कुंकळ्ळी : काजुबियांनी भरलेला ट्रक मंगळूरहून गोवामार्गे कोल्हापूरला जात असताना केपे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील घोड्याव्हाळ येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात एका महिलेसह दोघांना मृत्यू आला, तर 10 जण जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून जखमी झालेल्यांमध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. मयतांपैकी अकू सतालिया ही महिला जागीच ठार झाली, तर देवराज सतारिया याला उपचारासाठी इस्पितळात नेताना त्याला मृत्यू आला. दोन्ही मयत व्यक्ती मूळ गुजरातच्या आहेत, अशी माहिती कुंकळ्ळी पेलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केपे तालुक्यातील घोड्याव्हाळ येथील वळणावर जुन्या पुलाच्या कठड्याला धडक देऊन सदर ट्रक खाली खोलगट भागात पडला. हा अपघात शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडला. या ट्रकमधून सुमारे 15 जण प्रवास करत होते. त्यातील अरविंद, संतोष व राहुल या तिघांची प्रकृती गंभीर असून मुक्ता, किरण तसेच विक्रम, युवराज, रानी, बीरव, अर्नव या मुलांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. जखमींपैकी काहींना बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले आहे, तर काहींवर मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहेत. या प्रकरणी चालक राकेश रामचंद्र गोरल (रत्नागिरी-महाराष्ट्र, वय 29 वर्षे) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यालाही किरकोळ दुखापती झाल्या अहेत. या ट्रकमध्ये क्लिनर साहील अशोक चव्हाण हाही होता. मात्र त्याला फारशी इजा पोहोचलेली नाही.

 ट्रक सरळ मुखावर कोसळला. तो आडवा कोसळला असता, तर अधिक हानी झाली असती, असे पोलिसांनी सांगितले. या ट्रकमधून वाहून नेण्यात येणाऱ्या काजुबियांच्या पिशव्यांच्या खाली सापडून त्यातून जाणाऱ्या व्यक्ती जखमी झाल्या तसेच त्यांना प्राण गमवावा लागला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुंकळ्ळी पोलीस स्थानकावरील हेड कॉन्स्टेबल विनोद काणकोणकर, परेश गावकर व इतर पोलिसांनीही धाव घेतली. निरीक्षक डायगो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कविता रावत तपास करत आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनीही शनिवारी रात्री अपघाताच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून जवळच ख•s येथे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी दोन ट्रकांमध्ये अपघात होऊन एका ट्रकचालकाचा बळी गेला होता, तर अन्य एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला होता. घोड्याव्हाळ भागात रस्ते अरुंद असल्याकारणाने अपघातांना आमंत्रण मिळत असून सरकारने त्वरित येथे उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

सतारिया कुटुंबियांवर काळाचा घाला

Advertisement

मंगळूरहून कोल्हापूर येथे हा ट्रक जात होता. मूळ गुजरातचे असलेले सतारिया कुटुंबीयही त्यात चढले. सतारिया कुटुंबीय त्यांना मंगळूरला मिळाले आणि तेथे ट्रकचालक व त्यांच्यात बोलणी होऊन चालक त्यांना ट्रकमधून नेण्यास तयार झाला. मात्र दुर्दैवाने त्यांना वाटेत जीवघेण्या अपघाताला तोंड द्यावे लागून कुटुंबातील दोघांना गमावण्याचा प्रसंग आला.

मुख्यमंत्री, समाजकल्याणमंत्र्यांची तत्परतेने मदतीसाठी धाव

हा अपघात झाला त्यावेळेस काणकोणमधील सभा आटोपून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई परत येत होते. ते घोड्याव्हाळ येथे पोहोचण्याच्या काही वेळ पूर्वी तेथे हा अपघात घडला होता. त्यांनी अपघाताचे दृष्य पाहताच लगेच खाली उतरून त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांच्याबरोबर पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांनीही मदतकार्य करण्यास पुढाकार घेतला. मुख्यमंत्री  सावंत, मंत्री फळदेसाई पोहोचेपर्यंत नीळू वेळीप, सुरज लोटलीकर, शैलेश वेळीप, सुरज नायर, राजेश गावकर हे बीट पोलीसही तेथे पोहोचले. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी खाली उतरून मदत केली. तसेच काही जणांची प्रकृती त्यांनी तेथेच तपासली. त्याचप्रमाणे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एका महिलेस स्ट्रेचरवर टाकून उचलून वर आणण्यास साहाय्य. केले. मुख्यमंत्री सावंत व मंत्री फळदेसाई यांनी तत्परतेने केलेल्या या मदतकार्याचे कौतुक होत आहे. यावेळी मदतीला 108 सेवेची रुग्णवाहिकाही पोहोचली. सदर रुग्णवाहिका व बीट पोलिसांचे वाहन यामधून जखमींना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

Advertisement
Tags :
×

.