हलदीराममध्ये 2 आंतरराष्ट्रीय फर्म्सची गुंतवणूक
व्यवसाय वाढीवर देणार भर : टेमसेकचीही गुंतवणूक
नवी दिल्ली :
स्नॅक्स आणि गोड खाद्यपदार्थ उत्पादनासह विक्री करणाऱ्या हलदीराममध्ये आणखी दोन कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. अल्फा वेव ग्लोबल आणि इंटरनॅशनल होल्डिंग (आयएचसी) कंपनी यांनी हलदीराममध्ये गुंतवणूक करण्यास रस घेतला आहे.
याआधी टेमसेक यांनी हलदीराममध्ये 10 टक्के हिस्सेदारी जवळपास 1 अब्ज डॉलर्सना खरेदी केली होती. टेमसेक सिंगापूरमधली गुंतवणूक फर्म आहे. नव्या व्यवहारांतर्गत इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी आणि अल्फा वेव ग्लोबल यांनी एकत्रित 6 टक्के इतकी हिस्सेदारी घेण्याचे निश्चित केले. यानंतर हलदीराम स्नॅक्स फूडचे बाजार मूल्य 85 हजार कोटी रुपयांवर पोहचणार आहे. यायोगे पॅकेज फूड क्षेत्रातील सर्वाधिक मूल्याची कंपनी म्हणून आता हलदीरामची ओळख होणार आहे. अल्फा वेव ग्लोबल ही आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फर्म असून इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी ही सुद्धा संयुक्त अरब अमिरातमधील मोठी गुंतवणूक फर्म आहे. या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकीनंतर आता हलदीराम कंपनीला आगामी काळात अमेरिका आणि मध्य आशियातील व्यवसाय विस्ताराकडे लक्ष द्यावे लागणार आहे.