पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 2 भारतीय
कॅनडात जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा : अनिता आनंद, जॉर्ज चहल यांचे नाव चर्चेत
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडात जस्टिन ट्रुडो यांनी सत्तारुढ लिबरल पार्टीचे नेतेपद आणि पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा दिला. पक्षाचा नवा नेता निवडण्यात आल्यावर आपण पंतप्रधानपद सोडू अशी घोषणा ट्रुडो यांनी केली आहे. यामुळे लिबरल पार्टीचा नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदाकरता अनेक नावे समोर आली असून यात भारतीय वंशाचे नेतेही सामील आहेत. यात अनिता आनंद आणि जॉर्ज चहल यांना कॅनडाचे पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते. तर लिबरल पार्टीने नवा नेता निवडण्याची जबाबदारी सचित मेहरा या भारतीय वंशीय नेत्याकडेच सोपविली आहे.
ट्रुडो हे पक्षाच्या नेतेपदावरून हटल्याने अनेक नेते त्यांची जागा घेण्याच्या शर्यतीत सामील आहेत. यात क्रिस्टिया फ्रीलँड, मार्क कार्नी, डॉमिनिक लेब्लांक, मेलानी जोली, फ्रांस्वा-फिलिप शॅम्पेन, क्रिस्टी क्लार्क, अनिता आनंद आणि जॉर्ज चहल यांचे नाव सामील आहे. अनिता आणि जॉर्ज हे भारतीय वंशाचे कॅनेडियन नेते आहेत.
अनिता आनंद या माजी संरक्षणमंत्री असून वर्तमान काळात त्या परिवहन अन् अंतर्गत व्यापार मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. अनिता यांचे आईवडिल हे तामिळनाडू अन् पंजाबशी संबंधित आहेत. आनंद यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे. तसेच कोरोना महामारीदरम्यान त्यांनी अत्यंत चांगले काम केले होते. यामुळे त्यांना कॅनडात मोठी लोकप्रियता मिळाली होती. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत चांगली मानली जाते.
तर भारतीय वंशाचे आणखी एक नेते अल्बर्टाचे लिबरल खासदार जॉर्ज चहल यांनाही पंतप्रधान होण्याची संधी आहे. चहल यांनी मागील आठवड्यात स्वत:च्या कॉकस सहकाऱ्यांना एक पत्र लिहून ही विनंती देखील केली. एक वकील आणि कम्युनिटी लीडर म्हणून चहल यांनी कॅलगरी सिटी कौन्सिलरच्या स्वरुपात विविध समित्यांमध्ये काम केले आहे. ते नैसर्गिक संपदेसंबंधी स्थायी समिती आणि शीख कॉकसचे अध्यक्ष देखील आहेत.
जोली यांचे नाव चर्चेत
वरिष्ठ लिबरल कॅबिनेट मंत्री आणि ट्रुडो यांचे निकटवर्तीय डोमिनिक लेब्लांक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. फ्रीलँड यांच्या राजीनाम्यानंतर ते वर्तमान अर्थमंत्री आहेत. विदेशमंत्री मेलानी जोली देखील या पदाकरता प्रमुख दावेदार आहेत. तर फ्रांस्वा-फिलिप शॅम्पेन यांचे नाव चर्चेत असून ते व्यापार अन् आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. याचबरोबर ब्रिटिश कोलंबियाचे माजी प्रीमियर क्रिस्टी क्लार्क यांनीही ट्रुडो यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शविली आहे.
फ्रीलँड यांचा दावा मजबूत
कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून उपपंतप्रधान अन् अर्थमंत्री राहिलेल्या क्रिस्टिया फ्रीलँड यांचा दावा सर्वात मजबूत मानला जातो. आंतरराष्ट्रीय अनुभव आणि आर्थिक प्रावीण्य त्यांना या पदासाठी सर्वात योग्य दावेदार ठरवत आहे. पंतप्रधान पदासाठी बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी देखील ठोस दावेदार आहेत. त्यांचे वित्तीय कौशल्य आणि अर्थकारणाचे ज्ञान त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.