रेल्वे अपघातात झारखंड येथे 3 ठार
मुंबई-हावडा मेल गाडीचे डबे रुळावरुन घसरल्याने दुर्घटना, चौकशीचा आदेश
वृत्तसंस्था / रांची
मुंबईहून हावडा येथे जाणाऱ्या मेल गाडीचे 22 डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी झारखंड राज्याच्या सराईकेला-खरसावन जिल्ह्यातील पाटोबेरा या खेड्यानजीक घडली. गाडीचा एक डबा दुसऱ्या डब्याला आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हा अपघात नेमका कसा झाला हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, एक गाडी दुसऱ्या गाडीवर आदळल्याने हा अपघात झालेला नाही, एवढे स्पष्ट आहे. कदाचित तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक या अपघाताला कारणीभूत असू शकते, असे रेल्वे प्रशासनाने प्रतिपादन केले आहे. घटनास्थळी आपत्कालीन साहाय्यता पथके पोहचली असून त्यांनी कार्याला प्रारंभ केला आहे. काही प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. जखमींची संख्या 50 हून अधिक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. काही जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
गाड्यांचे मार्ग बदलले
या अपघातानंतर या लोहमार्गावरुन जाणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर विभागाचे रेल्वे अधिकारी या अपघाताची चौकशी करीत आहेत. या अपघातात मृत झालेले प्रवासी बी-4 या एकाच डब्यातील असल्याचे दिसून आले आहे. इतर डब्यांमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र, कोणी मृत झालेले नाहीत. हा बी-4 डबा कापून काढून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.
मानवी चूक कारणीभूत ?
या अपघाताला रेल्वेच्या चालकाची चूक कारणीभूत आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. दोन गाड्यांची टक्कर झालेली नसताना असा अपघात कसा झाला, हे अद्याप तरी एक गूढ असून सखोल तपासानंतरच खरी कारणे समोर येतील, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. काही कारणामुळे रेल्वे मागे आणत असताना एक डबा रेल्वेपासून तुटला आणि तो अन्य डब्यावर चढल्यामुळे अनेक डबे रुळावरुन घसरले, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली असली तरी दिला दुजोरा मिळालेला नाही. सध्या रेल्वेचे प्रशासन आपत्कालीन साहाय्यतेच्या कार्यात गुंतलेले असून प्रवाशांचे जीव वाचविणे ही प्राथमिकता आहे.
तिसरा रेल्वे अपघात
गेल्या दोन आठवड्यांमधील हा तिसरा रेल्वे अपघात आहे. अपघातांपासून संरक्षण करणारी यंत्रणा त्वरेने उपयोगात आणण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने काही काळापूर्वी स्पष्ट केले होते. ‘कवच’ या भारतनिर्मित यंत्रणेची चाचणी पूर्ण झाली आहे. तथापि, या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ही उपकरणे सर्व रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानके यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी अद्याप काहीसा वेळ लागणार आहे. कवच ही यंत्रणा असे अपघात होऊ न देण्यात सक्षम असल्याचे प्रतिपादन रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केले होते.
विरोधकांची सरकारवर टीका
दोन आठवड्यांमध्ये 3 रेल्वे अपघात झालेले आहेत. यावरून रेल्वेची स्थिती या केंद्र सरकारच्या काळात किती दयनीय झाली आहे, हे दिसून येते, अशी टीका विरोधी पक्षांनी केली. संसद अधिवेशनात या घटनेचे पडसाद उमटलेले दिसून आले. विरोधी पक्ष प्रत्येक घटनेचे राजकारण करतात असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.