बेंगळुरात फिल्मी स्टाईलने 2 कोटींची लूट
व्यवसायाकरिता रोकड क्रिप्टो करेन्सीमध्ये बदलण्यासाठी आल्यानंतर दरोडा
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळुरात फिल्मी स्टाईलने दिवसाढवळ्या 2 कोटींची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारी एम. एस. पाळ्या येथील वाणिज्य संकुलात क्रिप्टो व्यवहारादरम्यान सहा जणांच्या सशस्त्र टोळीने केंगेरी येथील 33 वर्षीय व्यावसायिकला लुटले.
श्रीहर्ष व्ही. हे पैसे युएसडीटी (क्रिप्टो करेन्सी) मध्ये बदलण्यासाठी आले असता तेथे आलेल्या दरोडेखोरांनी हल्ला करून रोकड आणि चार मोबाईल लंपास केले. श्रीहर्षना तेथेच कोंडून दरोडेखोलांनी पलायन केले. विद्यारण्यपूर पोलीस स्थानक हद्दीतील एम. के. एन्टरप्रायझेस येथे ही घटना घडली आहे. एफआयआरनुसार श्रीहर्ष यांनी कोल्ड प्रेस्ड ऑईल उद्योग सुरू करण्यासाठी मित्रांकडून 2 कोटी रुपये कर्जस्वरुपात घेतले. जर्मनीतून मशिन आणण्याची त्यांनी योजना आखली होती. त्यासाठी 2 कोटी रुपये घेऊन ते युएसडीटीमध्ये रुपांतर करण्यासाठी त्यांनी मित्र प्रकाश अगरवाल आणि रक्षित यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी श्रीहर्षची बेंझामिन या व्यक्तीशी ओळख करून दिली.
बेंझामिनने श्रीहर्षना एम. एस. पाळ्या येथील एम. के. एन्टरप्रायझेसजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार बुधवार 25 जून रोजी दुपारी 3 वाजता एम. एस. पाळ्याजवळील व्यापारी संकुलात बेंझामिन आणि श्रीहर्ष एकमेकांना भेटले. तेथील एका दुकानात श्रीहर्ष यांनी आलेले पैसे बेंझामिन आणि त्याचे दोन मित्र मोजत होते. तेव्हा 4 च्या सुमारास सहा शस्त्रधारी व्यक्तींनी श्रीहर्ष यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्यावर चाकू लावून 2 कोटी रुपये लुटले. श्रीहर्ष व इतरांना तेथेच कोंडून दरोडेखोरांनी पळ काढला. काही वेळानंतर बेंझामिन आणि त्याचे साथीदारही तेथून पसार झाले.
श्रीहर्ष यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विद्यारण्य पोलीस स्थानकात तपास हाती घेतला आहे. हवाला संपर्काच्या संशयावरून धागेदोरे हाती लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएसच्या सेक्शन 310(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बेंझामिन, श्रीहर्ष आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे.