विजापूरमध्ये 2.93 कोटी रुपये जप्त
जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांची माहिती
वार्ताहर /विजापूर
हैद्राबाद येथून हुबळीला बेहिशेबी रक्कम खासगी वाहनातून घेऊन जात असल्याची माहिती सोमवारी रात्री विजापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहनातील 2 कोटी 93 लाख 50 हजार रक्कम जप्त केली असून वाहनातील दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई विजापूर सीईएन पोलीस पथकाने केली आहे, अशी माहिती विजापूर जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी दिली आहे. अधिक माहिती देताना ते म्हणाले, सोमवारी रात्री सीईएन पोलीस ठाण्याचे सीपीआय सुनीलकुमार नंदेश्वर, कर्मचारी एम. के. हावडी, डी. आर. पाटील, एम. बी. पाटील, मल्लू हुगार यांनी विजापूर शहरातील सिंदगी बायपासवर सापळा रचला होता. त्यावेळी आलेल्या खासगी वाहनाची कसून तपासणी केली असता गाडीत रक्कम सापडली आहे. या प्रकरणी सांगली जिह्यातील बालाजी निकम आणि सचिन मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. या कामी वापरण्यात आलेली खासगी कार क्रमांक एमएच-01 सीडी 7537 कार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. सदर कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.