For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sant Dnyaneshwar Palkhi 2026: हायटेक तंत्रज्ञान आणि शुद्ध चांदी; जाणून घ्या माऊलींच्या नव्या रथाची काय आहेत वैशिष्ट्ये?

11:42 AM Jul 02, 2026 IST | NEETA POTDAR
sant dnyaneshwar palkhi 2026  हायटेक तंत्रज्ञान आणि शुद्ध चांदी  जाणून घ्या माऊलींच्या नव्या रथाची काय आहेत वैशिष्ट्ये
Advertisement

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा शुद्ध चांदीचा रथ साकारण्यात आला असून, या रथाची निर्मिती केआरए अर्थात कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनी केली आहे. ८ जुलै रोजी हा रथ पालखी प्रस्थान सोहोळ्यात दाखल होईल. पारंपरिक सौंदर्य अबाधित ठेवत रथाचे वजन कमी करण्याचे आव्हान पेलण्यात यश आल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सुलभ होणार आहे.

Advertisement

याविषयी माहिती देताना विपुल अष्टेकर म्हणाले की, रथ निर्मिती करताना त्याची मजबुती कायम राखत वजन शक्य तितके कमी करणे हे मोठे आव्हान होते. यासाठी केआरए ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करत इपॉक्सी पॉलीस्टर रेझिन आणि कार्बन फायबर बेस यांच्या साहाय्याने रथाची निर्मिती केली. या तंत्रज्ञानामुळे रथाची मजबुती लोखंडाइतकी भक्कम असून त्याचे वजन ॲल्युमिनियमप्रमाणे हलके आहे. या नव्या रथाचे एकूण वजन सुमारे २.८ टन आहे.

रथाच्या निर्मितीत आळंदी देवस्थानातील शुभ चिन्हांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली असून रथाच्या अग्रभागी माऊलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जयविजय यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. रथावरील आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकाम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले आहे. त्यामुळे रथाला धार्मिक परंपरेशी सुसंगत आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Advertisement

रथाजवळ होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर व रथाच्या सुरक्षेवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी रथावर १० सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. परंपरेचे जतन करत आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून साकारण्यात आलेला हा शुद्ध चांदीचा रथ यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.