अडीच वर्षांचा फॉर्म्युला, पुढील काळात मंत्रिपदी संधी मिळेल
आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती : शिवसेना बळकटीसाठी एकजुटीने प्रयत्न करणार
कोल्हापूर
महायुतीमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असुन पुढील अडीच वर्षात मंत्रिपदी नक्की संधी मिळेल. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारा दरम्यान जाहीर सभेत शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी आमदार आबिटकर यांना मंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यांनी तो पूर्ण केला. गेल्या अडीच वर्षात घडलेल्या घडामोडींमध्ये शिवसेनेसोबत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना दिलेला शब्द पूर्ण ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आबिटकर यांच्या निवडीस मान्यता दिली असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
पत्रकात म्हटले आहे, शिवसेना मुख्यनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री पदाच्या दर्जाचे पद मला कायम ठेवले आहे. यासह मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असेल अथवा पक्ष संघटनेतील महत्वाची पदे असतील यातून नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मंत्री दर्जा पदाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन त्यांनी कोल्हापूर जिह्याचा विकास करण्याची संधी दिली. मंत्री पद असल्यावरच राज्याचा व जिह्याचा विकास साध्य करता येते असे नाही. जिह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी व शिवसैनिक असल्याने मला योग्य ती जबाबदारी दिली जाईल. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे नाराजीचे कोणतेही कारण नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांना जाहीर सभेत मंत्री करण्याचा शब्द मुख्यनेते शिंदे यांनी दिला होता. त्यांनी तो पाळला यावरून आम्ही कोणताही खोटा शब्द देत नाही हे सिद्ध होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करणार असल्याचे क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोल्हापूर पालकमंत्री पदासाठी आग्रही
कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि चार आमदार असल्याने पालकमंत्री पद शिवसेनेस द्यावे, अशी मागणी शिवसेनेचा वरिष्ठ पदाधिकारी म्हणून शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मागणीची ते नक्की दखल घेतील असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.