Crop Damage: 10 वर्षात अडीच लाख हेक्टर पिकांचे नुकसान, यंदा 47 हजार हेक्टरमध्ये पाणी
अतिवृष्टी आणि महापुरामुळे 2019 आणि 2021 मध्ये सर्वधिक नुकसान झाले आहे.
By : संतोष पाटील
कोल्हापूर : कोल्हापुरातील गेल्या 10 वर्षांत वादळी पाऊस, वादळी वारे, पूर आणि महापुरामुळे 2 लाख 42 हजार 669 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे आकडेवारी सांगते. यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे 2019 आणि 2021 मध्ये सर्वधिक नुकसान झाले आहे.
यावर्षी गेल्या महिन्यातील अतिवृष्टी धरुन 47 हजार हेक्टरवरील पिकाचे पाणी झाले आहे. बदलत्या हवामानानुसार पिकांत बदल करणे, पेरणीच्या वेळा बदलण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास पकडणे हेच काय ते पर्यांय शेतकऱ्यांपुढे आहेत.
जिह्यात 2019-20 मध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे 78 हजार हजार 137 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. 2020-21 मध्ये आलेल्या महापूर आणि अवकाळी पावसामुळे 1 लाख 2 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. 2016-17 मध्ये 1 लाख 5 हजार 933 क्षेत्रातील खरीप आणि खास करुन ऊस उत्पादनावर गंभीर परिणाम झाला होता.
वादळी वारे आणि चक्रीवादळामुळे 2021-22 मध्ये 12.68 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. अतिपावसाने जमीन खचणे किंवा गारपीठीमुळे 2021-22 मध्ये 1723 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते.
कारणे : गेल्या दशकात पावसाचे प्रमाण आणि त्याची अनियमितता वाढली. परिणामी महापुराची वारंवारता वाढली आहे. अलमट्टी धरणासह कृष्णा आणि पंचगंगा खोऱ्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात समन्वयाचा अभाव महापुराला कारणीभूत ठरला आहे, ज्याची चर्चा स्थानिक तज्ञांनी केली आहे.
नदीकाठावरील बांधकामे आणि गाळ साचण्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला, ज्याने नुकसान वाढले. सह्याद्री पर्वतरांगांमुळे पावसाचे प्रमाण जास्त असून, त्याचा परिणाम खालच्या भागात पूर आणि महापुराच्या स्वरूपात होतो.
शेतकऱ्यांवरील परिणाम : पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने अर्थकारणावर विपरीत परिणाम. झाला आहे. ज्यामुळे ऊस, सोयाबीन, भात आणि फळबागा यांसारख्या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.
उपाययोजना : शेतकऱ्यांना विमा योजनांचा प्रभावी वापर करुन शासनाने लाभ मिळवून द्यावा. शेतीमालाचे हमीभाव वाढवावा. धरणांमधून पाणी सोडण्यासाठी समन्वय आणि पूर्वसूचना यंत्रणा मजबूत करावी. दुष्काळ आणि पूर यांना तोंड देण्यासाठी टिकाऊ पिकांची निवड करावी. शेतकऱ्यांना हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षणावर भर द्यावा.
महापूरच नुकसानीचे कारण
गेल्या 10 वर्षात 2012-13 मध्ये पूर आला नाही, फक्त गारपीठ झाली, 147.8 हेक्टर इतक्याच पिकाचे नुकसान झाले. पुढील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने 0.03 हेक्टरचे नुकसान झाले. 2017-18 ला पूर आला नाही, मात्र गारपीठ आणि वादळाने 134.94 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. महापुरात नुकसानीची व्याप्ती किमान 75 हजार हेक्टरच्या पुढे जाते, तर पूरस्थितीत 10 हजार हेक्टरपर्यंत असते. पूर आला नाही तर जिह्यातील पिकांचे नुकसान होत नसल्याचे आकडेवारी सांगते