ऑगस्टमध्ये चारधाम यात्रेत 2.31 लाख भाविक दाखल
गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक संख्या : बद्रीनाथला सर्वाधिक 1.25 लाख यात्रेकरूंनी भेट
वृत्तसंस्था/देहराडून
उत्तराखंडमध्ये ऑगस्ट महिन्यात पाऊस आणि भूस्खलन होत असतानाही चारधाम यात्रेतील भक्तांच्या ओघाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या चार वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात चारधामला सर्वाधिक यात्रेकरूंनी भेट दिली आहे. यावर्षी एकूण 2 लाख 31 हजार 518 यात्रेकरूंनी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट दिली. त्यापैकी 1.25 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी बद्रीनाथ धामला भेट दिली असून हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. तीन वर्षांनंतर या ऑगस्टमध्ये केदारनाथमध्येही सर्वाधिक शिवभक्तांची नोंद झाली.
यावर्षी 19 एप्रिल रोजी सुरू झालेली उत्तराखंड चारधाम यात्रा जुलै महिन्यात मंदावली होती. तथापि, मुसळधार पाऊस, बंद महामार्ग आणि अनेक ठिकाणी भूस्खलन होऊनही ऑगस्ट महिन्यात विक्रमी संख्येने यात्रेकरूंनी हजेरी लावली. यावर्षी, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात चारधाम यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची संख्या 93,680 ने वाढली, तर 2024 च्या तुलनेत 1,18,502 अधिक भाविक आले.
हेलिकॉप्टर सेवेचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपासून
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपासून सुरू होईल. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या मते, मान्सून ओसरल्यानंतर हेलिकॉप्टर उ•ाणांसाठी हवामान सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला. हेलिकॉप्टर सेवेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय, एएआय आणि डीजीसीए यांच्याशी समन्वय साधला जात आहे.