9 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 2.26 लाख कोटींची भर
मुंबई
मागच्या आठवड्यात शेअरबाजारात आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 2.26 लाख कोटी रुपयांची भर पडली असल्याची माहिती आहे. यामध्ये टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या बाजार भांडवलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 969 अंकांनी वधारला होता. सदरच्या आठवड्यात टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 85,493.74 कोटी रुपयांनी वाढून 14,12,412 कोटी रुपयांवर पोहचले आहे. इन्फोसिसचे मूल्य 36793 कोटींनी वाढत 6,55,457 कोटी रुपयांवर पोहचले आहे. एसबीआयचे बाजार भांडवल मूल्य 30,700 कोटी रुपयांनी वाढून 5,78,671 कोटी रुपयांवर तर दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे मूल्य 26,386 कोटीनी वाढत 16,88,173 कोटी रुपयांवर पोहचले होते. यासोबत आयसीआयसीआय बँकेचे मूल्य 18,493 कोटी रुपयांच्या वाढीसह 7,27,330 कोटीवर तर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 14,294 कोटींच्या वाढीसह 5,03,722 कोटी रुपयांवर पोहचल्याचे पाहायला मिळाले.