For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ल्याची तयारी

06:27 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ल्याची तयारी
Advertisement

ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमध्येच ठाण : ‘विकेंड’ कार्यक्रम रद्द

Advertisement

वृत्तसंस्था : 

तेहरान/वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘विकेंड’चा गोल्फ कार्यक्रम रद्द करून अचानक व्हाईट हाऊसमध्येच ठाण मांडले आहे. त्यांच्या या पूर्वनियोजित कार्यक्रमात अचानक बदल झाल्याने अमेरिका आणि इराणमधील तणावाबद्दलच्या अटकळांना बळ मिळाले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिका इराणवर नवीन लष्करी हल्ल्यांची तयारी करत असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे अमेरिकेकडून हल्ल्याची तयारी केली जात असली तरी दुसरीकडे इराणनेही पूर्णपणे सज्जता पाळली आहे. तसेच इराणी लष्कर शत्रूच्या कोणत्याही मूर्खपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचा शाब्दिक पलटवारही करण्यात आला आहे.

ट्रम्प प्रशासन संभाव्य नवीन हल्ल्यांची योजना आखण्याचा विचार करत आहे. तूर्तास कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला तरी ट्रम्प आढावा बैठकांमध्ये व्यग्र असल्याचे दिसत आहे. वृत्तानुसार, अमेरिकेच्या प्रशासनातील आणि लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुट्ट्या आणि सुट्टीच्या योजना रद्द केल्या आहेत. अमेरिकेत लष्करी आणि प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी वेगवेगळ्या सहा देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचेही समजते. त्यांच्या चर्चेतील तपशील उघड करण्यात आला नसला तरी इराणसोबतच्या तणावाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांकडून केला जात आहे.

अमेरिकेने फेटाळला इराणचा प्रस्ताव

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणचा नवीन प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावात कायमस्वरूपी युद्धविरामानंतर अणुकार्यक्रमावर चर्चा करण्याच्या मागणीचा समावेश होता. इराणचा अणुकार्यक्रम हे त्यांचे प्राधान्य असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. कायमस्वरूपी युद्धविराम आणि अणुकरार एकाचवेळी झाले पाहिजेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे.

शांतता चर्चेपासून इस्रायल दूर

ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत सुरू असलेल्या शस्त्रसंधी आणि अणुचर्चांमधून इस्रायलला वगळले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली अधिकाऱ्यांना अमेरिका-इराण चर्चेची माहिती थेट वॉशिंग्टनकडून मिळत नाही. त्यांना प्रादेशिक नेते, राजनैतिक संपर्क आणि इराणमधील स्वत:च्या गुप्तचर यंत्रणेच्या देखरेखीद्वारे माहिती गोळा करण्यास भाग पाडले जात आहे. हा बदल पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांनी स्वत:ला ट्रम्प यांच्यावर सर्वाधिक प्रभाव असलेला नेता म्हणून नेहमीच सादर केले आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुद्दा चर्चेत समाविष्ट केला जाणार नसल्याने इस्रायलसाठी आणखी एक मोठी चिंता निर्माण झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते.

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि इस्रायल अत्यंत जवळच्या समन्वयाने काम करत होते. दोन्ही देशांचे सैन्य एक समान रणनीती तयार करत होते. पण जसजसे युद्ध लांबत गेले आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या, तसतसे ट्रम्प यांचे लक्ष युद्ध संपवण्यावर अधिक केंद्रित झाले. सध्या अमेरिका आणि इस्रायल यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये भिन्नता दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.