नव्या वर्षात 192 कंपन्यांचे आयपीओ येणार
2.5 लाख कोटी उभारण्याचे उद्दिष्ट, रिलायन्ससह दिग्गजांचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात 2026 मध्ये अनेकविध कंपन्या आपला आयपीओ सादर करण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये अंदाजे 84 कंपन्या आयपीओ आणणार असून त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. याशिवाय जवळपास 108 कंपन्यांनी आयपीओकरिता सेबीकडे आपले अर्ज सादर केले आहेत. दोन्ही मिळून सर्व कंपन्यांचे आयपीओ बाजारात सादर केले जाणार असून एकंदर 2.5 लाख कोटी रुपये उभारले जातील, असे म्हटले जात आहे.
जियोच्या आयपीओवर लक्ष
या आयपीओ सादरीकरणामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव आग्रकमावर आहे. या कंपनीचा डिजीटल आणि टेलिकॉम शाखेचा म्हणजेच जिओचा आयपीओ पुढील वर्षी बाजारात येऊ शकतो. भारतातील कंपनीचा हा सर्वात मोठ्या मूल्याचा आयपीओ असेल, असाही अंदाज व्यक्त केला जातो.
यांचे येणार आयपीओ
या व्यतिरिक्त ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टदेखील आपला आयपीओ आणणार असून तिचे मूल्य 60 ते 70 अब्ज डॉलरचे असेल. डिजीटल पेमेंट क्षेत्रात कार्यरत दिग्गज कंपनी फोन पे यांचाही आयपीओ पुढील वर्षी सादर होणार असून यातून कंपनी 1.5 अब्ज डॉलर्स उभारणार आहे. ओयोदेखील आयपीओ आणण्याची तयारी करते आहे. वित्तसेवा क्षेत्रात एसबीआय फंडस् मॅनेजमेंट यांचा आयपीओ नव्या वर्षात येणार आहे. हिरो फिनकॉर्प, फिनटेक स्टार्टअप कंपनी नावी, क्विक कॉमर्स कंपनी झेप्टो आणि बोट यांचाही आयपीओ पुढील वर्षी येणार आहे.