शरद पवार, रामदास आठवलेंसह राज्यसभेचे 19 सदस्य शपथबद्ध
अलीकडेच 37 नव्या सदस्यांची निवड-फेरनिवड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यसभेच्या 19 नवीन आणि पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली. शरद पवार व्हीलचेअरमधून संसदेत शपथ घेण्यासाठी आले होते. शपथ घेतलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 5, ओडिशामधील 3, तामिळनाडूमधील 6 आणि पश्चिम बंगालमधील 5 सदस्यांचा समावेश होता. भाजप सदस्या माया चिंतामण यांनी सर्वात पहिल्यांदा शपथ ग्रहण केली. त्यानंतर शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रामराव सखाराम वडकुते (भाजप), ज्योती नागनाथ वाघमारे (शिवसेना), रामदास आठवले (आरपीआय) या महाराष्ट्रातील सदस्यांनी शपथ घेतली.
राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांनी शपथ घेतली. बहुतांश सदस्यांनी आपापल्या प्रादेशिक भाषांमध्ये शपथ घेतली. याप्रसंगी उपसभापती हरिवंश आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही उपस्थित होते. शपथविधीनंतर सभापती राधाकृष्णन यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. अलीकडेच 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका पार पडल्या. आता 18 खासदारांचा शपथविधी व्हायचा बाकी आहे.
शपथबद्ध झालेले राज्यसभा सदस्य
महाराष्ट्र (5 सदस्य)
माया चिंतामण (भाजप)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
रामराव सखाराम वडकुते (भाजप)
ज्योती नागनाथ वाघमारे (शिवसेना)
रामदास आठवले (आरपीआय)
ओडिशा (3 सदस्य)
मनमोहन सामल (भाजप)
सनरुप्त मिश्रा (बिजू जनता दल)
दिलीप कुमार राय (अपक्ष)
तामिळनाडू (6 सदस्य)
कॉन्स्टंटाइन रवींद्रन (डीएमके)
ख्रिस्तोफर मॅनिकम (काँग्रेस)
एल. के. सुधीश (डीएमके)
एम. थंबीदुराई (एआयएडीएमके)
तिरुच्ची शिवा (डीएमके)
अंबुमणी रामदास (पीएमके)
पश्चिम बंगाल (5 सदस्य)
बाबुल सुप्रियो बराल (तृणमूल काँग्रेस)
बिस्वजीत सिन्हा (भाजप)
मनिका गुरुस्वामी (तृणमूल काँग्रेस)
राजीव कुमार (तृणमूल काँग्रेस)
रुक्मिणी मलिक (तृणमूल काँग्रेस)