शाळेवर विमान कोसळून 19 ठार
बांगलादेशमधील दुर्घटना, 100 लोक जखमी
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशमध्ये एका शाळेवर युद्धविमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा बळी गेला आहे. 100 हून अधिक जखमी असून त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भारतात अहमदाबाद येथे झालेल्या प्रवासी विमान दुर्घटनेप्रमाणे ही घटना घडली आहे.
सोमवारी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी बांगलादेश वायुदलाचे एफ-7 हे विमान बांगलादेशची राजधानी ढाकाच्या उत्तर भागातील एका शाळेवर कोसळले. यामुळे विमानासह शाळा इमारतीलाही आग लागली. यावेळी शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विमानाचा चालक आणि विमानातील अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी आगीमुळे होरपळले आहेत.
बचावकार्य वेगाने
या घटनेची माहिती मिळताच ढाक्यातील आपत्कालीन साहाय्यता दलांनी घटनास्थळाकडे जाऊन बचावकार्य हाती घेतले. अनेक जणांचा जीव वाचविण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. ढाक्यातील पाच रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार केले जात आहेत. हे विमान मोहम्मद तौकीर इस्लाम हा चालक चालवत होता. त्याच्यासंबंधी निश्चित माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशिक्षणासाठीचे विमान
युद्ध विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी या विमानाचा उपयोग करण्यात येत होता. हे प्रशिक्षण दिले जात असतानाच ही दुर्घटना घडली आहे. विमानावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचा संपर्क तुटला आणि विमान भरकटत जाऊन शाळेवर कोसळले. या शाळेत पदवीपूर्व शिक्षणाचे वर्गही चालत होते. विमान कोसळले तेव्हा अनेक विद्यार्थी त्यांच्या वर्गात शिक्षण घेत होते. दुर्घटनेमुळे लागलेल्या आगीत अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा मृत्यू झाला आहे.
वरचा मजला भस्मसात
दुर्घटनाग्रस्त शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालय दोन मजल्यांचे आहे. या इमारतीचा वरचा मजला या दुर्घटनेत जळून खाक झाला आहे. अनेकजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विमान कोसळल्यानंतर काही वेळाने आजूबाजूला राहणारे लोकही बचावकार्य करण्यासाठी पुढे झाले होते. तथापि, आगीच्या धगीमुळे त्यांच्यापैकी काहीजणही जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश बांगलादेशचे प्रशासन आणि त्या देशाच्या वायुदलाने दिला आहे.
चार तासांनी आग आटोक्यात
शाळेच्या इमारतीला धडक दिल्यानंतर प्रथम विमानाने पेट घेतला. त्यानंतर शाळेचे वरचे मजलेही पेटले. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला चार तास लागले. त्यानंतरही काही तास आग धुमसत होती. अनेक मृतदेहांचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटविणे अशक्य झाले आहे. तसेच, मृतांची नेमकी संख्या समजण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती बांगलादेशच्या प्रसार माध्यमांनी दिली आहे.