सहाव्या टप्प्यात 180 कलंकित उमेदवार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सहावा टप्पा येत्या शनिवारी, अर्थात 25 मे या दिवशी आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. या मतदानासह, एकंदर 543 मतदारसंघांपैकी 429 मतदारसंघांमधील मतदार पार पडले आहे. आता 114 मतदारसंघांमधील मतदान व्हायचे आहे. सहाव्या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून या टप्प्यातील उमेदवारांवर नोंद असणारे गुन्हे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती यांची माहिती ‘असोसिएशन फॉर डेमेक्रेटिक रिफॉर्मस्’ (एडीआर) या सामाजिक संघटनेने आपल्या अहवालात प्रसिद्ध केली आहे. या माहितीवरचा हा दृष्टीक्षेप...
कलंकित उमेदवार किती...
? सहाव्या टप्प्यात एकंदर 869 उमेदवार स्पर्धेत आहेत. हे प्रमाण प्रत्येक मतदारसंघात सरासरी 15 इतके पडते. या टप्प्यासमवेतच यंदाच्या लोकसभा निवडणुकेचे मतदान पूर्ण होण्याकडे वाटचाल करु लागणार आहे. मागच्या सर्व पाच टप्प्यांप्रमाणे या टप्प्यातही कलंकित उमेदवारांची संख्या बरीच मोठी आहे.
? या टप्प्यातील एकंदर 866 उमेदवारांपैकी 180 उमेदवार कलंकित आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. ही माहिती या उमेदवारांनी उमेदवारी आवेदनपत्र सादर करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे. नियमानुसार असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक उमेदवाराला आवेदनपत्रासह द्यावे लागते.
? एडीआर या संघटनेने या टप्प्यातील 869 उमेदवारांपैकी 866 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला असून या उमेदवारांची माहिती मिळविली आहे. उमेदवारांवर असणाऱ्या गुन्ह्यांच्या नोंदींप्रमाणेच सर्व उमेदवारांची आर्थिक परिस्थिती, उमेदवारांच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती यासंबंधी माहिती आहे.
विविध पक्षांची स्थिती...
? भारतीय जनता पक्षाने या टप्प्यात 51 उमेदवार दिलेले आहेत. त्यांच्यापैकी 28 उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. टक्केवारीच्या भाषेत हे प्रमाण 55 टक्के इतके आहे. उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांच्या कलंकित उमेदवारांची संख्या मोठी आहे. या टप्प्यात काँग्रेसने 25 उमेदवार दिलेले असून त्यांच्यापैकी 8 उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. हे प्रमाण 32 टक्के इतके आहे. ही स्थिती मोठ्या पक्षांची आहे.
? प्रादेशिक आणि छोटे पक्षही कलंकित उमेदवारांच्या संदर्भात मोठ्या पक्षांच्या मागे नाहीत. उलट काही प्रमाणात पुढेच आहेत. राजकीय साधनशुचितेसंबंधी उच्चारवाने बोलणाऱ्या आम आदमी पक्षाचे या टप्प्यातील सर्व चार उमेदवारांच्या विरोधात गंभीर गुन्हे नोंद आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्व 5 उमेदवार कलंकित तर,समाजवादी पक्षाचे 13 पैकी 8 उमेदवार कलंकित आहेत.
? ओडीशामध्ये बिजू जनता दलाच्या 6 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हे नोंद आहेत. तृणमूल काँग्रेसचेही 9 पैकी 4 उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय अनेक अपक्ष उमेदवारही कलंकित असून त्यांची संख्या 100 हून अधिक आहे. हे गुन्हे असे आहेत की ते सिद्ध झाल्यास खासदाराला पद गमवावे लागू शकते. तो निवडणुकीसाठी अपात्र होऊ शकतो.
उमेदवारांची आर्थिक स्थिती...
? सहाव्या टप्प्यातील 869 उमेदवारांपैकी 338 उमेदवार कोट्याधीश आहेत. सर्व राजकीय पक्षांनी अनेक धनवानांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे. अपक्षांमध्येही श्रीमंत उमेदवारांची संख्या मोठी आहे. टक्केवारीच्या भाषेत धनवान उमेदवारांचे प्रमाण 39 टक्के इतके आहे. कर्ज असलेल्यांची संख्याही मोठी आहे.
? भारतीय जनता पक्षाच्या 51 उमेदवारांपैकी 48 उमेदवार कोट्याधीश आहेत. काँग्रेसमध्ये हे प्रमाण 25 उमेदवारांमध्ये 20 इतके आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शिवसेना आदी प्रादेशिक पक्षांनीही अनेक कोट्याधीश उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे दिसून येते.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता
? सहाव्या टप्प्यातील 869 उमेदवारांपैकी 332 उमेदवारांचे शिक्षण 5 वी ते 12 वी पर्यंत झालेले आहे. हे प्रमाण एकंदर उमेदवार संख्येच्या 38 टक्के आहे. तर 487 उमेदवारांनी पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षणाची नोंद त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केली आहे. हे प्रमाण 56 टक्के आहे, अशी माहिती अहवालात आहे.
संपत्ती आणि गुन्हे यांचा संबंध...
? तज्ञांच्या मते उमेदवारांची संपत्ती आणि त्यांच्या विरोधात नोंद असलेले गुन्हे यांचा अर्थाअर्थी संबंध दिसून येत नाही. याचा अर्थ असा की गंभीर गुन्हे नोंद असलेले उमेदवार अधिक धनवान असतात, असा सरसकट निष्कर्ष काढता येत नाही. काही प्रमाणात असे असू शकते. पण त्यावरुन कोणताही नियम ठरविता येत नाही. परिणामी, उमेदवाराची संपत्ती आणि त्याच्या विरोधात नोंद असणारे गुन्हे यांचा संबंध जोडता येत नाही. धनवान नसलेल्या उमेदवारांविरोधातही गंभीर गुन्ह्यांची नोंद असू शकते, असे राजकीय अभ्यासकांनी स्पष्ट पेलेले आहे.
सर्वात श्रीमंत कोण...
? सहाव्या टप्प्यातील उमेदवारांपैकी प्रथम तीन क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक, बिजू जनता दलाचा एक, तर आम आदमी पक्षाचा एक आहे. भारतीय जनता पक्षाचे हरियाणातील उमेदवार उद्योगपती नवीन जिंदाल यांची संपत्ती 1 हजार 241 कोटी रुपयांची आहे. बिजू जनता दलाचे ओडीशातील उमेदवार संतृप्त मिश्रा यांची संपत्ती 482 कोटी रुपयांची आहे. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. सुशिल गुप्ता यांची संपत्ती 169 कोटी रुपयांची आहे. याशिवाय राष्ट्रीय जनता दलाचे बिहारमधील उमेदवार दीपक यादव यांच्याकडे 74 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर लोकजनशक्ती-आर पक्षाच्या उमेदवार वीणा देवी यांच्याकडे 44 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय ज्यांची संपत्ती 1 ते 10 कोटी इतकी आहे, 25 हून अधिक आहेत.