राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत 18 तास चर्चा
पंतप्रधान देणार आभार प्रस्तावाला उत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेसाठी सरकारने लोकसभेत एकूण 18 तासांचा वेळ निश्चित केला आहे. ही चर्चा 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शुक्रवारी त्यासंबंधी अधिकृतपणे माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतील.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान रविवार, 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे. 28 जानेवारी रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले असून 29 रोजी अर्थमंत्र्यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडला आहे. आता सर्वांना अर्थसंकल्पातील घोषणांची उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा 5, 9, 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी लोकसभेत होईल. या चर्चेसाठी एकूण 18 तासांचा वेळ देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 फेब्रुवारी रोजी उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. गुरुवारी दुपारी लोकसभा तहकूब करण्यात आली असून आता 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होईल. रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीचा मार्ग मोकळा झाला आहे.