179 व्या स्थानावरील मॉरिशसने भारताला रोखले गोलशून्य बरोबरीत
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादमधील गचिबोवली स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या इंटरकॉन्टिनेन्टल चषक फुटबॉल स्पर्धेचा भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरुवातीचा सामना गोलशून्य बरोबरीत संपला. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या नेतृत्वाखालील नवीन पर्वाची सुऊवात अशा प्रकारे गोलरहित लढतीने झाली असून दोन्ही संघांना गोल नोंदविण्याच्या दृष्टीने लक्ष्यावर एकच फटका लगावता आला. संपूर्ण खेळावर वर्चस्व गाजवूनही शेवटच्या सत्रात भारताला भेदकपणाचा अभाव जाणवला.
179 व्या क्रमांकावर असलेल्या मॉरिशसने 90 मिनिटे धीर दाखवला आणि दृढनिश्चयासह सामना केला, ज्यामुळे त्यांना एक मौल्यवान गुण मिळण्यास मदत झाली. भारताने दहा फटके आणि मॉरिशसने आठ फटके हाणले. असे असले, तरीही प्रत्येकी फक्त एक फटका लक्ष्यावर राहिला. दोन्ही संघांना मिळालेल्या कमी संधी यातून दिसून येतात. मॉरिशसने भारताच्या खेळाडूंवर जास्त दबाव टाकणे टाळून आपले स्थान कायम राखले. तथापि, मुख्य प्रशिक्षक गिलॉम मौलेक यांच्या या संघाने त्यांना मिळालेल्या प्रत्येक प्रतिआक्रमणाच्या संधीवर धोक्याचे संकेत दिले.
काही वेळा भारतीय खेळाडूंनी संधी गमावली आणि पाहुण्यांना संधी दिली. 20 व्या मिनिटाला आशिष रायच्या एका चुकीमुळे यानिक अॅरिस्टाइडला डावीकडून चेंडू नेण्याची संधी मिळाली, परंतु त्याच्या सहकाऱ्यांपैकी कोणीही याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने उपस्थित नव्हते. चार मिनिटांनंतर लालेंगमावियाच्या चुकीमुळे क्वेंटिन लालसिंगला चेंडू मिळाला, ज्याने 30 यार्डांवरून हाणलेला फटका अमरिंदरने सहज गोळा केला.
अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर भारताने काहीशी निकड दाखवायला सुऊवात करून आशिष आणि लल्लियांझुआला छांगटे यांच्या उजव्या बाजूने चाली हळूहळू वाढत गेल्या. 35 व्या मिनिटाला भारतीयांनी मॉरिशसचा गोलरक्षक केविन जीन-लुईसची कसोटी पाहिली. यावेळी थापाने गोलक्षेत्रात मनवीर सिंगला चेंडू पुरविला होता, पण त्याचा डाव्या पायाने हाणलेला फटका गोलरक्षकाच्या हातात गेला.
दोन मिनिटांनंतर मॉरिशसला पहिल्या सत्रातील सर्वोत्तम संधी मिळाली होती. पण त्यांना त्याचे सोने करता आले नाही. डिलन कॉलर्डने इमॅन्युएल व्हिन्सेंटला गोलक्षेत्राच्या काठावर चेंडू पुरविला होता. पण व्हिन्सेंटने हाणलेला फटका क्रॉसबारच्या काही इंच वरून गेला. मार्केझने मध्यांतरानंतर सहल अब्दुल समद आणि नंदकुमार सेकर यांना मैदानात उतरवून आक्रमणाचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न केला. पण सामन्यातील कोंडी त्यांना फोडता आली नाही.