चीनमध्ये महापूर, 17 जण ठार
वृत्तसंस्था / बीजींग
चीनच्या वायव्य भागात पावसाने धुमाकूळ घातला असून अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट उद्भवले आहे. या आपत्तीत आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला असून 33 जण बेपत्ता आहेत. गान्सू या प्रांतात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक हानी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रांताप्रमाणे इतरही अनेक मोठ्या प्रातांमध्ये सध्या पावसाचे थैमान होत असून चीनने प्रभावित लोकांच्या सुरक्षेसाठी आपली सर्व आपत्कालीन यंत्रणा कामाला लावल्याचे दिसून येत आहे.
चीनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महापुराचे संकट नेहमीच उद्भवत असते. तथापि, यावेळी पावसाने पूर्वीचे विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक महत्वाच्या शहरांमध्ये आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. अनेक स्थानी मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था कोलमडली. वीज पुरवठाही बंद पडला असून अनेक खेड्यांचा शहरांशी संपर्क तुटला आहे.
दक्षिण भागात भूस्खलन
चीनच्या दक्षिण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या आपत्तीत 12 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक भागांमध्ये लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली. अनेक नागरीकांना अधिक उंचीवरच्या सुरक्षित स्थानी पाठविण्यात आले. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पुरांमध्ये अडकलेल्या नागरीकांना सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
