जिल्ह्यात 167 नवीन कुष्ठरुग्ण
कोल्हापूर :
जिह्यात एप्रिल ते डिसेंबर 2024 अखेर एकूण 167 नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे. आरोग्य विभागाने त्यांना त्वरित औषधोपचार देण्यात आला आहे. तसेच नवीन शोधलेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या कुटुंबातील व रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या सदस्यांना कॅप्सुल रिफाम्पीसीनचा केवळ एक डोस देऊन त्यांना देखील कुष्ठरोगाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे.
एकीकडे जिल्हा प्रशासन जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी उपाय योजना करत आहे. दुसरीकडे जिह्यात नवीन 167 कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे. कुष्ठरोग मुक्त जिल्हा होण्यासाठी नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजिकच्या शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात जावून तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. या वर्षाचे अभियानाचे घोषवाक्य हे ‘चला सर्वांनी मिळून जनजागृती करून गैरसमज दूर करूया आणि कुष्ठरोगाने बाधित कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेऊ या‘ असे आहे.
- कुष्ठरोगाची लक्षणे
कुष्ठरोग हा इतर सर्वसाधारण आजारांसारखाच एक आजार असून तो प्रामुख्याने त्वचा व मज्जेला बाधित करतो. त्वचेवर फिक्कट पांढरा, लालसर, बधीर असलेला चट्टा, ज्यावरील केस गळलेले, घाम येत नसलेला कोरडा असा असतो. तर मज्जा बाधीत असल्यास हाता-पायांमध्ये सतत मुंग्या येणे, हातापायातील शक्ती कमी होणे, हाताला किंवा पायाला बरी न होणारी जखम असणे इ. कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आहेत.
- कुष्ठरोग हमखास बरा होणारा आजार
कुष्ठरोग आजाराची निदानाची सोय सर्व शासकीय, निमशासकीय, महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत केलेली आहे. तसेच निदान निश्चित झाल्यावर त्यावरील बहुविध औषधोपचार (एम.डी.टी) देखील मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोग हा हमखास बरा होणार आजार आहे.
डॉ. हेमलता पालेकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभाग