भारताच्या टॉफी निर्यातीत 12 वर्षांत 166 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : भारतातून होणारी टॉफीची निर्यात गेल्या 12 वर्षांत 166 टक्क्यांनी वाढून 2025-26 या आर्थिक वर्षात 132 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 20 मे रोजी सोशल मीडियावर ही माहिती दिली. 2013-14 या आर्थिक वर्षात देशातून टॉफीची एकूण निर्यात 49.68 कोटी रुपये होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘भारताची ‘टॉफी कथा’ (टॉफी की कहानी) नक्कीच अनेकांना आनंद देणारी असेल! 2013-14 पासून टॉफीच्या निर्यातीत जवळपास 166 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.’
पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना मेलोडी टॉफी भेट दिली. ही टॉफी भारतात 1983 पासून विकली जात आहे. तिचे उत्पादन पार्ले कंपनी करते. मेलोनी आणि मोदी यांचा व्हिडीयो बुधवारी सर्वत्र चर्चेत राहिला होता. दुसरीकडे पार्लेच्या मेलोडी चॉकलेटशी काही संबंध नसणाऱ्या पार्ले इंडस्ट्रिजचा समभाग बुधवारी तेजीत राहिला होता.
‘मेलोडी’ हा हॅशटॅग 2023 पासून व्हायरल होत आहे. दोन्ही नेत्यांची नावे (मोदी आणि मेलोनी) एकत्र करून तयार केलेला ‘मेलोडी’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. हा शब्दप्रयोग सर्वप्रथम इटलीच्या पंतप्रधानांनी स्वत: 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या सीओपी28 शिखर परिषदेदरम्यान वापरला होता. यानंतर, जागतिक मंचांवर दोन्ही नेत्यांच्या सौहार्दपूर्ण भेटींमुळे हा हॅशटॅग सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहे.