उभादांडा किनाऱ्यावरून १६५ कासव पिल्ले समुद्रात झेपावली
या भागात अद्याप २४ कासव घरटी केली आहेत संरक्षित
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-सुखटनवाडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलीव्ह रिडले कासवाने 31 जानेवारी रोजी लावलेल्या दोन कासव घरट्यातून एकूण १६५ कासब पिल्ले आज रविवारी बाहेर आली. या सर्व कासव पिल्लांना उभादांडा सरपंच निलेश चमणकर व पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सागरी नैसर्गिक अधिवासांत सोडण्यात आली. उभादांडा-सुखटनवाडी समुद्र किनारी रहाणारे व मच्छीमारी व्यवसाय करणारे बस्त्याव ब्रिटो यांनी वनविभागाच्या सुचनेनुसार या किनारी अंडी लावणाऱ्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी सुरक्षित रहाण्यासाठी व त्याचे प्रजोत्पादन नैसर्गिकरित्या सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी केलेल्या सुचनानुसार किनाऱ्यावरील अनेक कासव घरटी संरक्षित केली. त्यांनी संरक्षित केलेल्या ९७ कासव अंड्यापैकी ९५ कासव पिल्ले आज बाहेर पडली. अजून त्यांनी संरक्षित केलेली ९ घरटी किनारी भागात आहेत. तसेच तेथीलच जॅक्शन सिमाव ब्रिटो यांनी अजून १५ घरंटी संरक्षित केलेली आहेत. त्यांनी लावलेल्या ८७ कासव अंड्यांपैकी ७० कासव पिल्ले आज रविवारी बाहेर निघाली. या दोन्ही कासव घरट्यातील एकूण १६५ कासव पिल्ले उभादांडा गावचे सरपंच निलेश चमणकर व वेंगुर्ले पंचायतसमितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सागरी नैसर्गिक अधिवासांत सोडण्यात आली. यावेळी कासव मित्र बस्त्याव ब्रिटो उर्फ देवा, जॅक्शन सिमाब ब्रिटो, तनीश चमणकर हे उपस्थित होते.