162 विद्यार्थी अडकले पुराच्या विळख्यात
झारखंडमधील निवासी शाळेतील घटना : सोशल मीडियावरून माहिती मिळताच सुटकेसाठी प्रयत्न
► वृत्तसंस्था/ रांची, जमशेदपूर
झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर जमशेदपूर जिह्यात मुसळधार पावसामुळे गुद्रा नदीची पाण्याची पातळी खूप वाढल्यानंतर नदीकाठच्या लव-कुश निवासी शाळेमध्ये पाणी शिरले. त्यानंतर येथे वसतिगृहात राहणारे 162 विद्यार्थी आणि कर्मचारी पुराच्या विळख्यात अडकले. शेवटी, मुले आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या छतावर चढली. यादरम्यान मुलांनी सुमारे 5 तास पावसात भिजून आपले प्राण वाचवले.
निवासी शाळेतील विद्यार्थी पुराच्या विळख्यात अडकल्याची माहिती रविवारी सकाळी हळूहळू सगळीकडे पसरली. सोशल मीडियावरून यासंबंधी प्रशासनालाही कल्पना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. दोरीच्या मदतीने सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सर्व 162 मुलांना आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढत त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. तत्पूर्वी बचावकार्यानंतर सर्व मुलांची तपासणी करण्यात आली. पहाटेपासून पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे मुले बरीच भयभीत झालेली दिसून येत होती. सध्या सर्वांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.
लव-कुश निवासी शाळेतील मुले पुरात अडकल्याची माहिती मिळाल्यापासून प्रशासन सक्रिय झाले होते. तर पोलीस अधिकारी धनंजय पासवान मुलांना वाचवण्यासाठी हाफ पॅन्टमध्ये पाण्यात उतरले होते. एलआरडी गौतम कुमार, बीडीओ अरुण मुंडा, एमओआयसी डॉ. रजनी महाकुड, डॉ. सुकांत सीट आणि इतर अनेक अधिकारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी मदत व बचावकार्यात सहभागी झाले होते.
पहाटे 4 वाजता शाळेत घुसले पाणी
लव-कुश निवासी शाळेचे संचालक सुशांत महातो यांनी सांगितले की, रविवारी पहाटे 4 वाजल्यानंतर शाळेचा खालचा भाग पाण्याने भरू लागल्यामुळे मुलांना उठवून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, गेटमधून बाहेर जाऊन पाहिले असता बाहेरही पाणी भरले होते. या परिस्थितीत मुलांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना छतावर नेण्यात आले. यानंतर, ग्रामस्थांना याबाबत माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत मुलांना बाहेर काढले. वसतिगृहात एकूण 122 मुले, 40 मुली आणि 7 कर्मचारी उपस्थित होते.
शाळा बंद करण्याचे आदेश
पोटका ब्लॉकचे वरिष्ठ प्रभारी एलआरडीसी गौतम कुमार यांनी सांगितले की, पोटका येथे लव-कुश निवासी शाळेच्या नावाने एक खासगी शाळा चालवली जात आहे. त्याची निवासी इमारत नदीकाठावर बांधली गेली आहे. ही शाळा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली नाही. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शाळा पाण्याखाली गेल्यामुळे वसतिगृहात राहणारी 162 मुले अडकली. सुदैवाने सर्व मुले सुरक्षित आहेत. सध्या शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.