शाळेच्या शेजारील कॅनलमध्ये आढळला 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह; वसतिगृहात सुरक्षा रक्षक नसल्यामुळे घटना घडल्याचा कुटुंबीयांचा आरोप
पंढरपूर: तालुक्यातील सरकोली येथील 16 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केसकरवाडी येथे समोर आली आहे. अहिल्या प्रशाला, केसकरवाडी येथे इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या समर्थ नागनाथ बोबडे या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शेजारील कॅनलमध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
समर्थ नागनाथ बोबडे हा सरकोली येथील रहिवासी असून, तो केसकरवाडी येथील अहिल्या प्रशालेत इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेत होता. तसेच तो शिवराम केसकर वसतिगृहात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शाळेच्या शेजारील कॅनलमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्याने या घटनेचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
समर्थच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी शाळा आणि संबंधित संस्थेच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. वसतिगृहात सुरक्षा रक्षकाची व्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असतानाही आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप पालक व नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून समर्थच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करावे तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत समर्थचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
दरम्यान, समर्थचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? कॅनल परिसरात सुरक्षा व्यवस्था होती का? वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे. या घटनेमुळे शाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.