दैव बलवत्तर म्हणून बचावले, रनपार समुद्रात 16 जणांसह सफारी बोट पलटली
सर्व पर्यटकांना वाचवले, समुद्र सफारी करताना घडली दुर्घटना
रत्नागिरी : नजीकच्या पावसजवळील रनपार समुद्रात 16 पर्यटकांना घेवून समुद्र सफारी करणारी बोट अचानक उलटून दुर्घटना घडली. सुदैवाने फिनोलेक्स कंपनीच्या अल फरदिन या बोटीतील तांडेल फरीद याने व पायलट बोट सिल्व्हर सनवरील बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आणि एमएसएफच्या जवानांनी तत्काळ मदत देऊन बुडत असलेल्या 16 जणांना वाचवले. मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमध्ये ‘सरस्वती’ होडीला मात्र जलसमाधी मिळाली.
रनपार येथे परशुराम जयंती उत्सवानिमित्त गावात काही तरुण आले होते. त्यापैकी काहीजणांना समुद्र सफारी करण्याचा मोह टाळता आला नाही. रनपार किनाऱ्यावर असलेली छोटी बोट घेऊन ते समुद्रात गेले. या होडीवर सुमारे 16 जण होते. समुद्र खवळलेला असल्याने बोटीचा तराफा तेथील एका खांबाला लागला आणि बोट उलटली. फिनोलेक्स जेटीच्या समोर साधारण 15 वावामध्ये हा प्रकार घडला. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सागरी सुरक्षा कवच अभियान सुरु आहे.
या माध्यमातून किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त सुरू होती. दुपारी 3 च्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती होडी घेऊन काहीजण फिरण्यासाठी रनपार खाडी परिसरात निघाले होते. या दरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या ही बाब निदर्शनास आली. जेटीसमोर बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन बोटींच्या सहाय्याने तातडीने घटनास्थळी जाऊन त्या बोटीमध्ये असलेल्या 16 जणांना वाचवण्यात आले.