For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केनियामध्ये आगीत 16 विद्यार्थिनी ठार

07:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
केनियामध्ये आगीत 16 विद्यार्थिनी ठार
Advertisement

मुलींच्या बोर्डिंग स्कूलमध्ये भीषण दुर्घटना : 79 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/नैरोबी

केनियातील मध्यवर्ती भागातील मुलींच्या बोर्डिंग स्कूलमध्ये रात्री भीषण आग लागल्याने 16 विद्यार्थिनी ठार आणि 79 जणी जखमी झाल्याची दु:खद घटना घडली. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गिलगिल भागातील उटुमिषी गर्ल्स स्कूलमध्ये वसतिगृहात अचानक आग लागल्याने ही दुर्घटना घडली. या अग्नितांडवावेळी बहुतेक विद्यार्थिनी आपापल्या खोल्यांमध्ये झोपलेल्या असल्यामुळे त्यांना वेळीच बाहेर पडता न आल्याने जीवितहानी झाली. आगीचे कारण अद्याप अज्ञात आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी निश्चित कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी गाढ झोपेत असताना आग लागली. वसतिगृहात आग इतक्या वेगाने पसरली की विद्यार्थ्यांना बाहेर पडायला जेमतेम वेळ मिळाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनी आगीच्या विळख्यात अडकताच सर्वत्र आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला. केनिया रेड क्रॉसची पथके, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव आणि मदतकार्य त्वरित सुरू करण्यात आले, पण तोपर्यंत आगीने आधीच मोठे स्वरूप धारण केले होते.

वसतिगृहात आग लागल्याची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचावकार्य पूर्ण होईपर्यंत अनेक विद्यार्थिनी आगीने होरपळल्याचे शिक्षणमंत्री ज्युलियस ओंगामा यांनी सांगितले. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 800 हून अधिक विद्यार्थिनी असलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. अनेक कुटुंबे चिंता आणि दु:खाने ग्रासली असून, आपल्या मुलांबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुरुवातीला अधिकाऱ्यांनी 10 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. तथापि, रुग्णालयात उपचारादरम्यान गंभीररित्या भाजलेल्या आणखी सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 16 झाली. याशिवाय, या अपघातात इतर 79 विद्यार्थी जखमी झाले. जखमींना सेंट जोसेफ रुग्णालय आणि परिसरातील इतर प्रमुख वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

यापूर्वीही अशा दुर्घटना

केनियामध्ये शाळांना आग लागण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. सर्वात मोठी घटना 2001 मध्ये माचाकोस काउंटीमध्ये घडली होती. त्यात 67 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारच्या दु:खद घटना 2024 आणि 2017 मध्येही घडल्या होत्या. आता या ताज्या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Advertisement
Tags :

.