Maharashtra Krushi Din 2025: शेती दैवत, कष्ट पूजा, पीक हाच प्रसाद, स्वयंपूर्ण शेती करणारं मोरे कुटुंब
कुटुंब शेती व्यवसायामुळेच अजूनही विभक्त न होता एकत्र राहते
By : गौतमी शिकलगार, साजिद पिरजादे
कोल्हापूर : पोटापाण्यासाठी शहराकडे न जाता शेतीच व्यवस्थित केली, तर कुटुंबाचा निर्वाह उत्तमरित्या होऊ शकेल. त्यातून आरोग्यदायी जीवन तर जगता येईलच, पण कृषिप्रधान भारताच्या विकासाला हातभार लागेल. हेच विचार कोल्हापूर जिह्यातील करवीर तालुक्याच्या कोगे गावातील मोरे कुटुंबाने प्रत्यक्षात आणले आहेत.
‘शेती आमचे दैवत, कष्ट हीच पूजा आणि पीक रुपाने मिळतो प्रसाद’ अशा भावना या कुटुंबाने आजच्या कृषी दिनाच्या निमित्ताने ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. मोरे कुटुंबाचे विशेष म्हणजे, हे कुटुंब शेती व्यवसायामुळेच अजूनही विभक्त न होता एकत्र राहत आहे.
कुटुंबातील 16 जण शेतीत काम करतात. काळाची पावले ओळखून त्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरली आहे. फक्त तीनच गोष्टी आणतात विकत मोरे कुटुंबाकडे एकूण 12 एकर शेती आहे. गेली 30 वर्षे त्यांचे कुटुंब एकत्र आहे. आम्ही बाजारातून केवळ मीठ, चहा पावडर आणि साबण या तीनच वस्तू विकत आणतो. बाकी सर्व जीवनोपयोगी वस्तू आम्ही घरच्या शेतीतच पिकवतो.
असे मोरे कुटुंबातील सदस्य आणि कोगे गावचे उपसरपंच मोरे सांगतात. मसाल्यातील तिळापासून ते खसखशीपर्यंत, तसेच वर्षभर पुरेल इतक्या भाज्या, फळे, खाद्यतेल, धनधान्य, डाळी सेंद्रीय पद्धतीने मोरे कुटुंब स्वतःच्या शेतात पिकवते. शेतातच भरपूर फळझाडे लावली असल्याने आवळ्यापासून फणसापर्यंत हंगामी फळांचा हे कुटुंब मनसोक्त आस्वाद घेते.
शेतीला जोड पशुपालनाची मोरे कुटुंबाकडे दोन म्हशी, दोन देशी गायी, एक जर्सी गाय आहे. मुलाबाळांसाठी घरात दूध ठेवून, उरलेले दूध डेअरीत पाठवले जाते. त्यांच्या शेतात चार खोंडेडी आहेत. त्यांच्या मदतीनेच ते पारंपरिक औजारांनी शेती करतात. कुटुंबाची गरज भागवून उरलेले दूध, धान्य, फळे, भाज्या ते बाजारात विकतात. सणाच्या काळात एक एकरात झेंडूही फुलवतात.
सेंद्रीय शेती ही काळाची गरज
एकूण १२ एकर शेतीपैकी मोरे कुटुंब ७ एकरमध्ये ऊस पिकवते. तर उरलेल्या शेतीत हंगामानुसार फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड करतात. गहू, बाजरी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, कुळीथ, मटकी ही धान्ये, कडधान्ये पिकवली जातात. कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, श्रावण घेवडा, भेंडी, ढबू मिरची, गवार, वरणा, चवळी, पालक, मेथी, पोकळा, कोथिंबीर, शेवगा या भाज्यांची लागवड केली जाते.
तसेच काकडी, दुधी भोपळा, दोडका या फळभाज्या, तर केळी, पपई, कलिंगड, संत्री, डाळिंब, रामफळ, सीताफळ, काजू, चिकू, आंबा, आवळा, जांभूळ, मोरआवळा, पेरू अशी विविध हंगामानुसार फळे पिकवली जातात. स्वयंपूर्ण आणि आरोग्यदायी जीवनाची किल्लीच जणू कोगे गावच्या मोरे कुटुंबाला सापडली आहे.
ही किल्ली प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे आहे. ती डोळसपणे वापरून त्यांनी सुखी आयुष्य जगले पाहिजे, अशी भावना कृषी दिनाच्या निमित्ताने 'तरुण भारत संवाद "शी बोलताना मोरे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.