गॅस गळतीच्या स्फोटात कराचीत 16 जण ठार
रमजानच्या पहिल्याच दिवशी हृदयद्रावक घटना
वृत्तसंस्था/कराची
पाकिस्तानच्या कराची येथे गुरुवारी गॅस गळतीमुळे झालेल्या भयंकर स्फोटात 16 जणांना प्राणास मुकावे लागले. संपूर्ण देश रमजानच्या पहिल्या दिवसाच्या तयारीत व्यस्त असताना, गुरुवारी सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटाने आनंदाचे शोकात रुपांतर केले. कराचीच्या ओल्ड सोल्जर बाजार परिसरातील एका निवासी इमारतीत झालेल्या संशयास्पद गॅस गळतीच्या स्फोटात किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. कराचीमध्ये गुरुवारी पहाटे 4:30 च्या सुमारास स्फोटाची दुर्घटना घडली. इमारतीतील बहुतेक रहिवासी रमजानच्या पहिल्या दिवशी सेहरी जेवणाची तयारी करत असताना स्फोट झाला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झालेला स्फोट इतका तीव्र होता की इमारतीचा एक जीर्ण भाग पूर्णपणे कोसळला. अग्निशमन दल आणि बचाव पथके दिवसभर शोधमोहीम राबवत होती. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील सर्वात दु:खद बाब म्हणजे जीव गमावलेल्यांमध्ये मोठी संख्या मुलांची होती.
बचाव कार्यकर्त्यांच्या मते, आतापर्यंत बाहेर काढलेल्या 14 मृतदेहांपैकी नऊ जण 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुले आहेत. शिवाय, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 14 जखमींमध्ये सात मुले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्फोटाचे मुख्य कारण गॅस गळती असल्याचे निष्पन्न झाले आहे. कराचीसारखे मोठे शहर बऱ्याच काळापासून नैसर्गिक वायूच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे. परिणामी, कमी उत्पन्न असलेल्या निवासी भागात राहणाऱ्या कुटुंबांना स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर वापरावे लागत आहेत. गॅस गळतीदरम्यानच कोणीतरी स्टोव्ह किंवा वीज चालू करताक्षणी स्फोट होऊन संपूर्ण इमारत कोसळली. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कराचीमध्ये अलिकडच्या काळात ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. गेल्या महिन्यातच कराचीच्या सदर परिसरातील गुल शॉपिंग प्लाझाच्या तळघरात भीषण आग लागली. त्या आगीत किमान 79 जणांना आपला जीव गमवावा लागला. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक प्रशासन आणि गॅस वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.