कराचीत इमारत कोसळून 16 ठार
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानातील औद्योगिक शहर कराची येथे एक इमारत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ही इमारत बहुमजली होती. ही दुर्घटना शुक्रवारी घडली आहे. अद्यापही या इमारतीच्या ढिगाऱ्यात आणखी 20 लोक अडकले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेची माहिती शनिवारी सकाळी देण्यात आली. शुक्रवारी रात्रमर आपत्कालीन साहाय्यता दलांनी 10 मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही इमारत एका अरुंद रस्त्याच्या कडेला असल्याने बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळापर्यंत साधनसामग्री पाठविणे अशक्य झाले होते. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढली. नियमानुसार बांधकाम न केल्याने इमारत कोसळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याने ते कच्चे राहिले होते, असाही आरोप केला जात आहे. पाकिस्तानात इमारती पडणे ही आता नित्याचीच बाब झाली असून प्रशासनाचे कोणत्याच बाबीवर नियंत्रण राहिलेले नाही, असाही आरोप होत आहे.