तिबेटमधील भूकंपात 16 ठार, 65 जखमी
मालमत्तेचे मोठे नुकसान : मदत-बचावकार्य सुरू : 12 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
वृत्तसंस्था/ ल्हासा
तिबेटमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात 16 जणांचा मृत्यू झाला असून 65 जण जखमी झाल्याची नोंद शुक्रवार सायंकाळपर्यंत झाली होती. या नैसर्गिक आपत्तीनंतर 12,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच मदत आणि बचावकार्यही गतीने सुरू करण्यात आले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, तिबेटसह परिसरात शुक्रवार सकाळपर्यंत 400 हून अधिक छोटे-मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. तिबेटसोबतच चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या काही भागातही भूकंपाची नोंद झाली आहे.
तिबेटमधील भूकंपामुळे बऱ्याच भागांतील दळणवळण विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भूकंपानंतर झालेल्या भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग 317 चा एक भागही बंद करण्यात आला आहे. भूकंपग्रस्त भागात पुढील तीन दिवसांत अधूनमधून हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
नागचू शहरात शेकडो घरे कोसळली
भूकंपाच्या धक्क्यांमुळे उत्तर भागातील नागचू शहरात शेकडो घरे कोसळल्याची माहिती प्रशासकीय विभागाकडून देण्यात आली. भूकंपानंतर किमान 339 घरे कोसळल्याचे नागचू माध्यम कार्यालयाने शहर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. विस्थापितांच्या निवासासाठी तंबूही उभारले जात आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच संपूर्ण परिसरात घबराट पसरली. घरे आणि वाहने हादरू लागली. जीव वाचवण्यासाठी लोक आपापल्या घरातून आणि हॉटेल्समधून बाहेर पळाले. दुकानांमधील रॅकमधून माल खाली पडतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पूर-भूस्खलनानंतर आता भूकंपाने हाहाकार
नेपाळ आणि चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर ऑगस्ट महिन्यात पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवल्यानंतर काही आठवड्यांतच तिबेटमध्ये हा भूकंप झाला आहे. या आपत्तींमध्ये 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेपत्ता झाल्याची नोंद झालेली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटमधील नागचू शहरातील बाचेन काउंटीमध्ये होता. हा भूकंप जमिनीच्या पृष्ठभागाखाली 10 किलोमीटरपेक्षा कमी खोलीवर झाला. हे ठिकाण तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे.
यापूर्वीही तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के
तिबेट हा जगातील भूकंपाचा उच्च धोका असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. येथे भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात. त्यांच्या हालचालीमुळे हिमालयाची पर्वतरांग तयार झाल्यामुळे या प्रदेशात भूकंपही होतात. जानेवारी 2025 मध्ये तिबेटमधील टिंगरी काउंटीमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे तिबेटमध्ये अंदाजे 400 लोकांचा मृत्यू झाला, तर शेजारील नेपाळमध्ये 13 जणांनी आपले प्राण गमावले. उत्तर भारतासह दक्षिण आशियाच्या अनेक भागांमध्ये त्याचे धक्के जाणवले होते. यापूर्वी, 2010 मध्ये चीनच्या शेजारील छिंगहाय प्रांतातील युशू येथे 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात किमान 2,698 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 300 जण बेपत्ता झाले होते.
