For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्शियन उपसागरात उभी 16 भारतीय जहाजं

06:45 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्शियन उपसागरात उभी 16 भारतीय जहाजं
Advertisement

433 खलाशी अद्याप अडकून : युद्धविरामामुळे बाहेर पडण्याची शक्यता

Advertisement

भारत सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार अद्यापही पर्शियन उपसागरात भारताची 16 जहाजं नांगर टाकून आहेत. याचबरोबर या भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर 433 खलाशी देखील सुमारे 40 दिवसांपासून अडकून पडले आहेत. आता अमेरिका आणि इराणदरम्यान दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली असल्याने तेथून ते लवकर कूच करण्याची एक नवी अपेक्षा निर्माण झाली आहे.

भारतीय जहाजे परतणे आता इराण किती लवकर त्यांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची अनुमती देतो यावर निर्भर असणार आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही व्यापारी जहाजाला पर्शियन उपसागरातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई, मुंद्रा, कांडला, कोची किंवा मंगळूर बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी 3-4 दिवसांचा कालावधी लागत होतो. हा कालावधी जहाजांचा आकार, भार आणि त्यांच्या वेगावर निर्भर असतो.

Advertisement

रवानगीनंतर 3-7 दिवसांचा कालावधी

इराण, ओमानसोबत मिळून युद्धविरामानुसार जहाजांना ज्या दिवसापासून जाण्याची अनुमती देईल, त्यापासून 3 दिवस ते एक आठवड्याचा कालावधी त्यांना भारतात पोहोचण्यासाठी लागणार आहे. युद्धविरामावरून इराणचे जे वक्तव्य समोर आले आहे, ते पाहता तो अटींच्या आधारावरच याची अनुमती देणार असल्याचे स्पष्ट आहे.

ओमानसोबत प्रोटोकॉल निर्मिती

युद्धविरामानंतरही होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक अटींच्या आधारावरच  निश्चित होणार असल्याचे इराणचे स्पष्ट म्हणणे आहे. ओमानसोबत मिळून होर्मुझ सामुद्रधुनीकरता प्रोटोकॉल निश्चित करणार असल्याचे इराणने जाहीर केले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या घोषणेसोबत होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग खुला करण्याबद्दल केलेला दावा यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

होर्मुझमध्ये पूर्वीप्रमाणे वाहतूक नसणार

-होर्मुजमधून जहाजांना जाऊ देण्यासाठी इराण जो प्रोटोकॉल निश्चित करत आहे, त्यात अनेक प्रकारच्या अटी असतील असे सांगण्यात येत आहे.

- इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून 2 दशलक्ष डॉलर्सचे शुल्क आकारले जाण्याची शक्यता असल्याने तणाव राहणार.

- होर्मुझ मार्गावरील जहाजांनी स्वत:च्या किनाऱ्याच्या अत्यंत जवळून जावे, जेणेकरून त्यांची ओळख पटविता येईल, अशी इराणची इच्छा असेल.

-या औपचारिकता पूर्ण करण्यास लागणारा कालावधी पाहता पर्शियन उपसागरातील जहाजांची कोंडी दूर करण्यास वेळ लागू शकतो.

आखाती देशांमधून येणारी 16 जहाजं

-भारतीय जहाजबांधणी मंत्रालयानुसार पर्शियन उपसागरात असलेल्या 16 भारतीय जहाजांवर वेगवेगळ्या कार्गो लादलेला आहे.

-या जहाजांमध्ये 1 एलएनजी आणि दोन एलपीजी टँकर आहेत. यातील एक एलपीजी टँकर रिकामी असल्याचे सांगण्यात आले.

-6 कच्च्या तेलाचे टँकर असून त्यातील एक टँकर रिकामी आहे.

-3 कंटेनर शिप, 1 ड्रेजर अन् 2 बल्क कंटेनर आहेत, एका जहाजावर रासायनिक उत्पादने लादलेली आहेत.

Advertisement
Tags :

.