गणेशोत्सवात कोकणात धावणार १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस
नितेश राणेंच्या मागणीला यश
न्हावेली / वार्ताहर
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.या निर्णयामुळे आता ८ डब्यांऐवजी ही ट्रेन १६ डब्यांसह धावणार आहे.याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती.त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठी गर्दी होते.अनेक चाकरमानी आपल्या गावी गणपतीसाठी जातात.या वाढत्या गर्दीमुळे नेहमीच तिकिटांची कमतरता जाणवते.ही समस्या लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी राणे यांच्याकडून करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढल्यामुळे जास्त प्रवाशांना एकावेळी प्रवास करता येईल आणि प्रवास अधिक आरामदायी व सुखकर होईल यामुळे ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा आहे.केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कोकणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरेल.