रिलायन्सला 15,138 कोटी रुपयांचा नफा
एप्रिल-जून तिमाहीचा निकाल जाहीर: समभागावर दबाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी आर्थिक वर्ष 2025 मधील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये पाच टक्के इतकी घसरण झाली आहे. तेल आणि रसायन व्यवसायामध्ये असलेल्या नरमीमुळे नफा कमी झाल्याचे कारण सांगितले जात आहे.
याच दरम्यान कंपनीच्या दूरसंचार आणि रिटेल व्यवसायाने मात्र सदरच्या तिमाहीमध्ये चांगली कामगिरी पार पाडली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये तेल ते टेलीफोन क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या कंपनीला 15 हजार 138 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त करता आला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत हाच एकत्रित निव्वळ नफा 16011 कोटी रुपये इतका होता. कंपनीने अकरा टक्के वाढीसोबत जूनच्या तिमाहीमध्ये 2 लाख 57 हजार 823 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
डिजिटल सेवा व्यवसाय व रिटेल व्यवसायामध्ये ग्राहकांचा वाढलेला प्रतिसाद यामुळे कंपनीला चांगली कामगिरी नोंदविता आली आहे. रिलायन्स जिओने 29,450 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
समभाग 3 टक्के घसरला
कंपनीचा तिमाही निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून त्याचा परिणाम सोमवारी शेअरबाजारात समभागावर दिसला. समभाग जवळपास 3 टक्के इतका घसरणीसह इंट्रा डे दरम्यान 3017 रुपयांवर खाली आला होता.