For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rain News | अजूनही १५१ वाड्या तहानलेल्याच

05:03 PM Jun 12, 2026 IST | NEETA POTDAR
rain news   अजूनही १५१ वाड्या तहानलेल्याच
Advertisement

मान्सूनचे आगमन झाले तरी पाणी टंचाईचे संकट कायम

Advertisement

रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अनेक भागांतील पाणी टंचाईचे संकट अद्याप कायम आहे. मे महिन्यातील अवकाळी सरी आणि मान्सूनचे आगमन झाले असले तरीही ग्रामीण भागातील पाणीटंचाईची दाहकता कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६४ गावांच्या १५१ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून येथील ४५ हजार ८८३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला अद्यापि टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यात सध्या विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मान्सूनच्या पावसाने सुरुवात केली आहे तर दुसरीकडे कडक उन्हाचा दाहही कायम आहे.

Advertisement

या प्रचंड उष्णतेमुळे जिल्ह्यातील विहिरी, नदीपात्र, सार्वजनिक तलाव आणि पाझर तलाव झपाट्याने आटले आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने पावसाचा जोर वाढेपर्यंत या भागातील पाणीटंचाईची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्हा पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टंचाईग्रस्त वाड्यांचा आकडा १५१ वर पोहोचला आहे.

दुर्गम आणि डोंगराळ भागातील वाड्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून १५ खाजगी आणि ३ शासकीय अशा एकूण १८ टँकरची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत या टँकरद्वारे तब्बल २ हजार ६५३ फेऱ्या पूर्ण करून जिल्ह्यातील नागरिक आणि जनावरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जून महिना उजाडूनही अनेक गावे व वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील जनतेत चिंतेचे वातावरण आहे.

लांजा-राजापूरला दिलासा

जिल्ह्यातील भीषण परिस्थिती असतानाही लांजा आणि राजापूर तालुक्यांसाठी एकही टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. या तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना सध्या सुरळीत सुरू असल्याने तिथे दिलासादायक स्थिती आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांतील पाणीटंचाईची बिकट स्थिती पाहता, जोपर्यंत पावसाचा जोर वाढून नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित होत नाहीत, तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच राहणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.