स्मृतीशताब्दी गेली इव्हेंटबाजीत आता...शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मशताब्दीत ठोस कृतीची अपेक्षा
कालच्या आणि आजच्या दोन्ही राज्यकर्त्यांकडून शाहूप्रेमींची निराशाच; राजर्षी शाहू विचारांचा जागर भाषणापुरताच...
संतोष पाटील कोल्हापूर
राजर्षी शाहू स्मृती शताब्दीच्यानिमित्ताने 2022-23 वर्षी 6 मे रोजी शाहू छत्रपती मिलच्या जागेवर कृतज्ञता सोहळा झाला. स्मृती शताब्दी पर्व हे इव्हेंट वर्ष न होता कृतीपर्व करुन लोकराजाला खरी आदरांजली ठरवण्याची संधी तत्कालीन राज्यकर्त्यांनी घालवली. यावर्षी राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने महत्वाची आहे. स्मृती वर्षाप्रमाणे शाहूप्रेमींची अपेक्षा फोल ठरु नये, राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर कृतीतून व्हावा. किमान राजर्षी शाहूंच्या नावाने ठोस काहीतरी करावे, अशी अपेक्षा आहे.
शाहूनगरी मुळचीच ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनाची खाण आहे. शाहू मिलच्या जागेचा वापर पर्यटन केंद्र म्हणून नव्हे तर येथे शाहूंच्या स्मृतीचे ज्ञानमंदिर झाले पाहिजे. परवा, कालच्या आणि आजच्या सत्ताधाऱ्यांकडून किमान शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी शाहूप्रेंमीची अपेक्षा आहे.
शाहू मिल जागेसह राजर्षींनी उभारलेली ज्ञान मंदिरे, शिक्षण आणि उद्योगाची केंद्र यांच्या नुतनीकरणासह आधुनिकीकरण, सक्षमीकरणासाठी ठोस प्रयत्न आणि पाठपुरावा झाला असता तरी ती राजर्षींना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरले असते. यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष आहे. प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न दाखवताना असो, शाहू महाराजांची लोकोपयोगी आणि समाजोन्नतीची धोरणं नजरेपुढे ठेवावी लागतील. कोल्हापूरसाठी एखादी लोकोपयोगी योजना राबवताना राजर्षी शाहूंनी आजच्या घडीला कोणता दृष्टीकोन ठेवला असता, याचा विचार विकास आराखडा करताना झाला पाहिजे. दुर्दैवाने तसा प्रयत्न सर्वपक्षीय नेतृत्वांकडून झाल्याचे उदाहरण नाही.
शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून राधानगरी धरण उभारले. आज त्याच्या शेजारी असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा मुहूर्त मिळेना. महाराजांनी कळंबा तलावातून पाण्याचा खजिना शहराला दिला. दहा वर्षापासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कासवछाप ठरली आहे. कोल्हापूर 1870 पर्यंत पेठा व वस्त्यांमध्ये विभागलेले खेडे होते. कसबा बावडा, जयंती नाला पूल, संभाजी पूल, साठमारी रस्त्यावरील हुतात्मा पूल, उमा टॉकीज येथील रविवार पूल, आदी महत्वाच्या पुलांची बांधणी त्यावेळच्या जयंती नदीवर झाली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोल्हापूर पूर्व बाजूला विस्तार झाला. पश्चेमेला पंचगंगा नदी असल्याने शहराच्या वाढीवर नैसर्गिक मर्यादा होत्या.
जयंती नाल्यावरील पुलांच्या बांधणीनंतर शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी परिसर वसला. 1870 ते1953 पर्यंत टप्प्याटप्प्याने या पुलांची बांधणी झाली. शहराच्या विस्तारात, विकासात मैलाचा दगड ठरलेल्या पुलांचे आयुष्यमान स्थापत्य शास्त्राच्या निकषानुसार संपलेले आहे. निर्माण काळात घोडागाडीची वाहतूक नजरेपुढे ठेवून या पुलांची बांधणी झाली. आजही याच पुलावर हजारो टन अवझड वाहनांच्या वाहतुकीचा भार आहे. या पुलांचे सक्षमीकरणही आताच्या राज्यकर्त्यांना जमलेलं नाही. नवीन शहर वसावे या उद्देशाने राजारामपुरी, शाहूपुरीची निर्मिती महाराजांनी केली. आता शहराची एक इंच हद्दवाढ करणे जमेल की नाही, याची शंका आहे.
महाराजानी वसवलेल्या पेठांमध्ये त्यावेळच्या घोडागाडीच्या काळात चार ट्रक एकाचवेळी जातील, असे रस्ते आहेत. राजारामपुरी, शाहूपुरी इतकंच काय जयसिंगपूर आदी परिसराची रचना युरोपमधील प्रशस्त रस्त्यांच्या धर्तीवर केली. वाहतूक सुरळीत होईल, पुढील 50 वर्षांचा विचार करुन रस्ते बांधणी करणे लांबच आहे. त्या रस्त्यांची दुरूस्तीही नियमित होत नाही. संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यागृह आणि खासबाग वगळता आपण एकही त्या तोडीचं सांस्कृतिक किंवा क्रीडा केंद्र उभारु शकलेलो नाही. शाहूराजाने कोल्हापुरात रेल्वे आणली. आज त्या रेल्वे रुळाची लांबी एक फुटही वाढवू शकलो नाही. राजकीय ताकद नसल्याने कोल्हापूर-कोकण रेल्वे तर स्वप्नवत आहे. कोल्हापूर शिक्षण आणि वैद्यकीय सेवांचं माहेरघर होते. आता कोल्हापूरला पुणे-बेंगलोरसारख्या शहरांनी कोसो दूर मागे टाकले आहे. महाराजांनी उद्यमनगरी वसवली. आठ एमआयडीसी गेल्या 40 वर्षापासून कागदावर आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून आलेल्या उद्योगांनीही काढता पाय घेतला आहे. कोल्हापूरला सर्व पातळीवर आघाडीवर नेण्यात राजर्षी शाहू महाराजांचे योगदान होते. आता आपण त्याच कोल्हापूरला सर्व बाबीत मोठ्या खेडंगावात रुपांतर केले आहे. याचे शल्य सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना वाटेल काय..?
शाहू स्मारकाच्याही पोकळ घोषणाच..
आताच्या बाजारभावाने किमान आठशे कोटी रुपये किंमत असलेल्या मिलच्या 27 एकर जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. 169 कोटींच्या प्रस्तावित स्मारकासाठी अर्थसंकल्पात दहा लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पुरवणी मागणीद्वारे आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासनही हवेतच विरले. 2018 च्या शाहू जयंती कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक व महिलांसाठी गारमेंट पार्क या गोष्टी विकसित करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील’, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर कृतज्ञता सोहळा शुभारंभात तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनीही शाहू मिल जागा विकासाचे स्वप्न दाखवले. यंदाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू विचारांचा जागर कृतीतून होईल, असे भासवले.
समतेच्या विचारांचाही विसर
शाहू महाराजांनी जगाला समतेचा विचार दिला. ही शाहूनगरी आज कोणीतरी उडणटप्पूने ठेवलेलं व्हॉटस्अॅपवरील स्टेटस आणि सोशल मिडीयावरील भाष्यावरुन पेटत आहे. शाहू विचारांने सर्वधर्मियांची एकोप्याची बांधलेली घट्ट मोट आता उसवू लागली आहे का, असा प्रश्न पडावा इतकी प्रक्षुब्धता काही घटकांत वाढत आहे. काही समाजकंटकाना शाहू राजाने बांधलेल्या शिक्षण संस्थावरही दगड मारताना जराही लाज वाटत नाही, हीच शाहू शतकोत्तर जयंतीची खरी शोकांतिका आह