गोव्यात १५०० विध्यार्थीनी दिली नीट परीक्षा
परीक्षा केंद्रांवर सीआयएसएफचा चोख बंदोबस्त : उमेदवारांची कागदपत्रे, ओळखपत्रे यांची काटेकोरपणे तपासणी
पणजी : नीट-युजी 2026 ही परीक्षा काल रविवारी गोव्यातील विविध केंद्रांतून सुरळीतपणे पार पडली. संपूर्ण देशासह गोवा राज्यात एकूण 12 परीक्षा केंद्रांतून ती घेण्यात आली. यावेळी पोलिसांसह इतर सर्व यंत्रणांचा चोख आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेसाठी स्थानिक गोवा पोलिसांचा वापर न करता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) पाचारण करण्यात आले होते आणि सर्व परीक्षा केंद्रांचा ताबा त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. राज्यातून सुमारे 4500 उमेदवारांनी त्या परीक्षेत भाग घेतला. दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 यावेळेत परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांची कागदपत्रे, ओळखपत्रे यांची काटेकोरपणे तपासणी झाली.
उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी कदंब बसगाडीची सोय करण्यात आली होती. मागे 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती. त्याचे तीव्र पडसाद गोव्यासह देशभर उमटले होते. काही परीक्षार्थिनी ताण सहन न झाल्यामुळे आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागणार या मानसिकतेमुळे आत्महत्या केल्याची प्रकरणे समोर आली. गोव्यातही एक आत्महत्या झाली. पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा घेण्यात आली आणि त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्तातून उमेदवारांना सामोरे जावे लागले. ही परीक्षा सुरळीत झाल्यामुळे गोव्यातील परीक्षार्थिनी सुटकेचा नि:श्वास टाकला.