कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘वंदे मातरम्’ राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण

07:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त 1 वर्षभर कार्यक्रम

Advertisement

वृत्तसंस्थ/नवी दिल्ली

Advertisement

थोर दिवंगत कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या, तसेच ज्याने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना आणि क्रांतीकारकांना देशभक्तीची प्रेरणा दिली, त्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाला आज शुक्रवारी 150 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या स्फूर्तीगीताची रचना 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी ‘अक्षय नवमी’च्या शुभप्रसंगी केली होती. हे गीत प्रथम त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ नामक अत्यंत गाजलेल्या बंगाली कादंबरीचा भाग होते. नंतर हे गीत राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले. या गीताचा हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आज 7 नोव्हेंबर 2025 पासून एक वर्षभर साजरा होणार आहे.

या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवासंबंधीचा मुख्य कार्यक्रम आज शुक्रवारी दिल्लीतील ‘इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य पद्धतीने होणार आहे. एक वर्षभर संपूर्ण देशात हा कार्यक्रम होणार असून त्याला ‘स्मरणोत्सव’ असे नाम देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी 9.39 वाजता या स्टेडियममध्ये या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते या गीताच्या स्मरणार्थ एका डाक तिकिटाचे आणि एका नाण्याचे अनावरणही करणार आहेत. या कार्यक्रमात या गीताचे समूहगान होणार आहे.

संपूर्ण देशात होणार कार्यक्रम

दिल्लीतील या मुख्य कार्यक्रमासह देशात सर्वत्र या गीताचा स्मरणोत्सव वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. देशात असंख्य स्थानी आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता या गीताच्या संपूर्ण संस्करणाचे, अर्थात या संपूर्ण गीताचे सामुहिक गायन केले जाणार आहे. या कार्यक्रमात लक्षावधी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व क्षेत्रांमधील आणि सर्व समाजघटकांमधील नागरीक, तसेच मान्यवर समाविष्ट होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

सर्व राज्यांमध्ये कार्यक्रम

या गीताच्या स्मरणोत्सवाचा हा कार्यक्रम सर्व राज्यांमध्येही वर्षभर साजरा केला जाणार आहे. जवळपास प्रत्येक राज्याने हा कार्यक्रम साजरा करण्यास मान्यता दिली आहे. या शतकोत्तर सुवर्णमहोत्सावानिमित्त देशभरात वर्षभर संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते. विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती आणि बालकांमध्येही राष्ट्रभक्तीची ज्योत पुन्हा प्रज्वलीत व्हावी, या उद्देशाने या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुस्लीम संघटनांचा विरोध

हे गीत गाण्याची अनिवार्यता मुस्लीमांसाठी असू नये, असे काही मुस्लीम संघटनांचे म्हणणे आहे. या गीतात इस्लाम धर्माच्या विरोधात जाणाऱ्या काही पंक्ती आहेत. त्यामुळे हे गीत इस्लाम धर्माच्या नियमांमध्ये बसू शकत नाही. परिणामी, ते गाण्यासाठी मुस्लीमांना भाग पाडले जाऊ नये, असा हट्टाग्रह धरला जात आहे.

प्रेरणादायी गीताचा संक्षिप्त इतिहास...

या गीताची रचना देशभक्त कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली आहे. ते त्यांच्याच ‘आनंदमठ’ या इतिहासप्रसिद्ध कादंबरीचा भाग आहे. या गीताला प्रथम प्रसिद्धी त्यावेळचे लोकप्रिय बंगाली नियतकालीक ‘बंगदर्शन’मधून देण्यात आली होती. हे गीत संस्कृत आणि बंगाली अशा दोन्ही भाषांमध्ये आहे. या गीताने त्यावेळी असंख्य तरुणांच्या मनात देशाला परकीयांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक क्रांतीकारक ‘वंदे मातरम्’ या शब्दांचा  आरव करत फाशी गेले. या गीताने स्वातंत्र्यसंग्रामाला एक  स्फूर्तीदायी आयाम मिळवून दिला. वंदे मातरम् हे केवळ शब्द नव्हते, तर तो देशभक्तीचा आणि स्वातंत्र्यसंग्रामाचा मंत्र बनला होता. आजही तो सर्वांसाठी मंत्रच आहे. मूळचे हे गीत सहा कडव्यांचे आहे. पण राष्ट्रगान म्हणून दोनच कडवी म्हटली जातात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article