कसोटी क्रिकेटची 150 वर्षे
इंग्लंड-ऑस्ट्रेलियात एमसीजीवर रंगणार पिंक बॉल टेस्टचा थरार : क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून घोषणा
वृत्तसंस्था/ सिडनी
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुना फॉरमॅट म्हणजे कसोटी. खेळाडूंची खरी टेस्ट कसोटीच्या फॉरमॅटमध्येच होते. येथे खेळाडूंचे क्रिकेट कौशल्य आणि संयम याची कसोटी लागते. क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च 1877 मध्ये मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. आता, 2027 मध्ये कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील सर्वात जुने क्रिकेट खेळणारे देश ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटीला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आमनेसामने येणार आहेत. ही एकमेव कसोटी मार्च 2027 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या ऐतिहासिक मैदानावर डे-नाईट स्वरुपात पिंक बॉलने खेळवली जाणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी दिली.
मार्च 2027 मध्ये मेलबर्न येथे होणारा 150 वा वर्धापन दिन कसोटी सामना हा जागतिक क्रिकेटमधील एक विलक्षण उत्सव असेल आणि त्या निमित्ताने इंग्लंडचे यजमानपद मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. कसोटी स्वरूपाचा पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. जो ऑस्ट्रेलियन संघाने 45 धावांनी जिंकला होता. आता, 2027 मध्ये होणारा उभय संघातील सामना ऐतिहासिक करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने समिती नेमली आहे. या समितीच्या नेतृत्वाची धुरा रिकी पाँटिगकडे देण्यात आले असल्याचे हॉकले यांनी यावेळी सांगितले.
प्रतिक्रिया
टेस्ट क्रिकेटच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त एमसीजीवर खेळवला जाणारा सामना भव्यदिव्य स्वरुपाचा असेल. हा सामना फ्लडलाईटसच्या प्रकाशात खेळवला जाईल, ज्यामुळे खेळाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक विकास स्पष्ट होईल. यामुळे हा ऐतिहासिक क्षण आणखी अविस्मरणीय बनेल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग