For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

150 पाकिस्तानी वधूंचा भारत प्रवास अखेर सुकर; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर रखडलेले विवाह लागणार मार्गी

11:17 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
150 पाकिस्तानी वधूंचा भारत प्रवास अखेर सुकर   ऑपरेशन सिंदूर नंतर रखडलेले विवाह लागणार मार्गी
Advertisement

मुंबई : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर व्हिसा प्रक्रियेतील अडचणी आणि वाघा-अटारी सीमा बंद झाल्याने रखडलेला पाकिस्तानी सिंधी वधूंचा भारतप्रवास अखेर सुकर झाला आहे. 150 हून अधिक पाकिस्तानी महिला आपल्या नातेवाइकांसह भारतात दाखल झाल्या असून, भारतीय वरांसोबत रखडलेले विवाह आता पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

सिंध प्रांतातील अनेक कुटुंबांमध्ये आपल्या मुलींचे विवाह भारतातील सिंधी समाजातील तरुणांशी करण्याची परंपरा आहे. यापूर्वी वाघा-अटारी सीमेवरून या कुटुंबांची भारत-पाकिस्तानदरम्यान सहज ये-जा होत होती. मात्र, 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' ही लष्करी कारवाई केली. परिणामी वाघा-अटारी सीमा आणि व्हिसा मार्ग बंद झाल्याने भारतातील विविध शहरांतील तरुणांशी विवाह ठरलेल्या पाकिस्तानमधील अनेक महिलांचा भारतप्रवास रखडला होता.

Advertisement

नागपूर, रायपूर, जोधपूर आणि पुणे यांसारख्या शहरांतील तरुणांशी विवाह ठरलेल्या जवळपास 150 पाकिस्तानी महिलांना या परिस्थितीचा फटका बसला होता. व्हिसा आणि प्रवासाच्या अडचणींमुळे विवाहाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.

आता संबंधित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारतात येण्याचा मार्ग सुकर झाल्याने रखडलेले विवाह पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील सिंधी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Tags :

.