For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त दीडशे कि.मी.मानवी साखळी

10:45 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त दीडशे कि मी मानवी साखळी
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पत्रकार परिषदेत माहिती : रविवारी राबविणार उपक्रम 

Advertisement

बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आपल्या देशातील लोकशाही व संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 145 किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, संविधानाची मूल्ये व त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी याविषयी जनमानसात जागृती करण्यासाठी गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी सामूहिकरीत्या संविधानाची उद्देशिका वाचण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यंदा बिदर जिल्ह्यातील बसवकल्याणपासून 30 जिल्ह्यात मानवी साखळी तयार करून संविधानाची उद्देशिका वाचन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बागलकोट जिल्ह्यापासून सुरू होणारी मानवी साखळी रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळीहून कित्तूर तालुक्यातील तेगूरपर्यंत असणार आहे. जिल्ह्यात 145 किलोमीटर मानवी साखळी तयार करण्याचे उद्दिष्ट असून सुमारे 1 लाख 25 हजारहून अधिक नागरिक यामध्ये भाग घेणार आहेत. रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी, के. चंदरगी, सौंदत्ती तालुक्यातील सोप्पलड, यरगट्टी, इंचल क्रॉस, बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी क्रॉस, सुतगट्टी क्रॉस, बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी, सांबरा, बेळगाव शहर, सुवर्ण विधानसौध, हिरेबागेवाडी, एम. के. हुबळी, इटगी क्रॉस, कित्तूरमार्गे तेगूरपर्यंत ही मानवी साखळी पोहोचणार आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य, विविध संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमात भाग घेऊन नागरिकांनी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस यशस्वी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी बोलताना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावागावांतून नागरिक स्वयंप्रेरणेने भाग घेणार आहेत. स्थानिक पातळीवर यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. प्रति दोनशे मीटरला एक सेक्टर अधिकारी असणार आहे. एक किलोमीटरला तालुका पातळीवरील व पाच किलोमीटरला जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्याची निगराणी असणार आहे. या कार्यक्रमासाठी परिवहन मंडळ व विविध शाळांच्या वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी समाजकल्याण खात्याचे रामनगौडा कन्नोळी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.