जमीन घोटाळ्यातील 15 सेलडीड जप्त
संशयितांच्या घरांवर छापेमारी : कागदपत्रे जप्त, ईडीची कारवाई
पणजी : जमीन घोटाळा प्रकरणातील संशयित महंमद सुहेल, आलकांत्रो डिसोझा, इस्टीवन डिसोझा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी करून विविध मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. त्यात 15 पेक्षा जास्त सेलडीडचा समावेश असून त्यांची एकूण किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. जमीन घोटाळ्याचा तपास अनेक यंत्रणांकडे फिरवण्यात येत आहे. सध्या हा तपास ईडीकडे देण्यात आला असून यापूर्वी तो आर्थिक गुन्हा विभागाकडे (ईओसी) नंतर तो एसआयटीकडे (विशेष चौकशी पथक) मग न्या. जाधव चौकशी एक सदस्य आयोगाकडे देण्यात आला होता. त्या तीन यंत्रणांकडून तपासकाम झाल्यावर आता ईडीने तपासाचे काम सुरू केले आहे. जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, सेलडीड, दस्तऐवज यांची तपासणी होणार असून ती बनावट आहेत का खरी याची खातरजमा केली जाणार आहे.
पोलिसांनी यापूर्वी वरील संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याची दखल घेऊन ईडीने पुढील तपासासाठी आता वरील छापेमारी केल्याचे सांगण्यात आले. ईडीतर्फे यापूर्वी म्हापसा येथील विशेष न्यायालयात वरील आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यात मनी लाँड्रींग असण्याची शक्यता वर्तवली आहे. ईडीने चौकशीच्या हेतूने विविध मालमत्ता ताब्यात घेतल्या असून पुढील तपासकाम चालू ठेवले आहे. पुरावे गोळा करण्यासाठी ईडी प्रयत्नशील असून आता ईडीच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होते. यावरच सदर जमीन घोटाळा प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.