एसटी तिकीटदरात 15 टक्क्यांची वाढ
प्रवाशांच्या खिशाला कात्री : शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू : रिक्षा-टॅक्सीच्या भाडेदरात 3 रुपयांची वाढ
प्रतिनिधी,/ मुंबई
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता राज्य सरकारने एसटीच्या भाडेदरात वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. एसटीची भाडेवाढ 15 टक्के केली असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. गुरुवारी मंत्रालयात प्रधान सचिव संजय सेठी यांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि एडीजी यांच्यात प्राधिकरणाची बैठक झाली. त्या बैठकीत एसटीच्या रखडलेल्या भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात आला. एसटी भाडेवाढीपाठोपाठ रिक्षा-टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून ही वाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे.
सवलती राहणारच
राज्यात आजपासून एसटीचा प्रवास महागला असला तरी महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रवास सवलतीत कोणताही फरक पडणार नाही. ती प्रवास सलवत महिलांना मिळणार आहे, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. आमच्या सरकारने ज्या सवलती आणि योजना सुरु केल्या आहेत, त्यामध्ये कुठेही कपात होणार नाही. सर्वसामान्य लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सवलत कायम राहील. या सवलतीमुळेच एसटीचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत कपात होणार नाही, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
एसटीची भाडेवाढ दरवर्षी करणे गरजेचे : मंत्री सरनाईक
एसटीची भाडेवाढ दरवर्षी करणे गरजेचे आहे. प्रवाशांना सुखसोयी देत असताना डिझेल-सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. एसटी महामंडळाची परिस्थितीत बघितली तर दरदिवशी सुमारे 3 कोटी, तर दर महिन्याला 90 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती. नवीन दरवाढीमुळे लांबच्या प्रवासासाठी प्रवाशांना सरासरी 70 ते 80 रुपये जास्त पैसे मोजावे लागतील. आतापर्यंत 100 रुपयांना मिळणाऱ्या तिकिटासाठी आता 115 रुपये मोजावे लागतील.
असे असतील एसटी प्रवासाचे दर
एसटीतून प्रवास करताना 6 किलोमीटरच्या टप्प्यासाठी भाडे आकारले जाते. साध्या बसचे पहिल्या टप्प्यासाठीचे भाडे 8.70 रुपये आहे. त्यासाठी आता 11 रुपये मोजावे लागणार आहेत. जलद सेवा (साधारण) आणि रात्रसेवा (साधारण) यांचे भाडे सारखे असेल. निमआरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील.
विनावातानुकूलित स्लीपर कोचसाठी 11.85 ऐवजी 15 रुपये, विनावातानुकूलित स्लीपर कोचसाठी 11.85 ऐवजी 16 रुपये, शिवशाही वातानुकूलित 12.35 ऐवजी 16 रुपये, जनशिवनेरी वातानुकूलित 12.95 ऐवजी 17 रुपये, शिवशाही (स्लिपर) - वातानुकूलित 13.35 ऐवजी 17 रुपये, शिवनेरी - वातानुकूलित 18.50 ऐवजी 23 रुपये, शिवनेरी (स्लिपर) - वातानुकूलित 22 ऐवजी 28 रुपये, शिवनेरी (स्लिपर) - वातानुकूलित 22 ऐवजी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.