.......मिंत्राच्या महसुलात 15 टक्के वाढ
मुंबई
फ्लिपकार्ट यांच्या मालकीची फॅशन क्षेत्रातील कंपनी मिंत्रा यांनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा मिळविण्यामध्ये यश मिळविले आहे. तोट्याचा एकंदर प्रवास यंदा थांबला आहे.
आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलामध्येसुद्धा 15 टक्के वाढ झाली आहे. एक वर्षामागे पाहता मिंत्रा कंपनी तोट्यामध्ये होती. खर्चामध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे यंदा कंपनीला नफा प्राप्त करता आला आहे. 2024 आर्थिक वर्षात कंपनीने 31 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी कंपनीची परिस्थिती कमालीची चिंताजनक होती. कारण 782 कोटी रुपयांचा मोठा तोटा कंपनीने मागच्या वर्षी सहन केला होता. त्या तुलनेमध्ये कंपनी नफ्यात आली आहे, हे कौतुकास्पद म्हणायला हवे. हे कंपनीच्या वाटचालीसाठी अधिक सकारात्मक असणार आहे.
याच दरम्यान 2024 आर्थिक वर्षात 15टक्के वाढीसह 5122 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी हाच महसूल 4465 कोटी रुपयांचा होता. अलीकडेच कंपनी क्विक कॉमर्स क्षेत्रात उतरली असून खर्चात जास्तीत जास्त कपातीसाठी प्रयत्न करते आहे. कंपनी अॅप्पारेल, अॅक्सेसिरीज आणि पादत्राणासह इतर उत्पादनांची विक्री करते.