शेतकऱ्यांना 14 वा हप्ता जारी
पंतप्रधानांच्या हस्ते 1.25 लाख किसान समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन
वृत्तसंस्था /सीकर
देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी गुरुवारचा दिवस विशेष ठरला. पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता पंतप्रधानांनी जारी केल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील सीकर येथे एका सरकारी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी या लाभदायक योजनेअंतर्गत हा हप्ता जारी केला. देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीकरमध्ये एका सरकारी कार्यक्रमात अनेक विकासकामांची पायाभरणीही केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्याबरोबरच त्यांनी 1.25 लाख किसान समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना, आज देशातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 1.25 लाख किसान समृद्धी केंद्रे समर्पित केली जात आहेत. याद्वारे शेतीशी संबंधित योजनांची माहिती, त्याचे फायदे, लाभ, सेवा आदी सुविधा एकाचठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही केले. यावेळी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान आणि गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानमधील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी पंतप्रधान गुजरातला रवाना झाले.