For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळीत 149 जणांना अतिसाराची बाधा

01:22 PM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
दाबोळीत 149 जणांना अतिसाराची बाधा
Advertisement

दूषित पाण्याचा संशय, तपास सुरू, सरकारी यंत्रणांकडे तक्रार

Advertisement

वास्को : आल्तो दाबोळी वास्कोतील एका इमारतीतील साडेतीनशे कुटुंबांचे आरोग्य सध्या धोक्यात आले आहे. पिण्याचे पाणी दूषित बनल्याने ही गंभीर समस्या निर्माण झाल्याचा संशय या इमारतीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे. या वसाहतीतील 149 व्यक्तींना अतिसाराची लागण झालेली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांनी यासंबंधी आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस खाते तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. दाबोळीतील प्रभू व्हायोलेटा या वसाहतीत हा प्रकार घडलेला आहे. वसाहतीतील नागरिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गेल्या आठवड्यात सुमारे 65 जणांना अतिसाराचा प्रभाव जाणवला होता. त्यांना जुलाब व उलट्या होऊ लागल्या होत्या.

त्यामुळे त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर या रुग्णांची संख्या 149 वर पोहोचली आहे. त्यामुळे या वसाहतीत भीती पसरलेली आहे. या वसाहतीत साडेतीनशे कुटुंबांचे वास्तव्य आहे. या वसाहतीसाठी पाणी पुरवठा खात्याच्या पाण्याबरोबरच बोअरवेलच्या पाण्याचाही वापर होतो. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या आठवड्यात या आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. तातडीने कारवाई करत बोअरवेल, भूमिगत टाकी आणि पाण्याच्या टाक्यांमधून पाण्याचे नमूने गोळा करण्यात आले. कुठ्ठाळी आरोग्य केंद्र आणि आयडीएसपीच्या पथकांनी यापूर्वीच सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम सुरू केली. तसेच या इमारतीतील नागरिकांना उकळलेले पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Advertisement

बोअरवेलचा पाणीपुरवठा बंद करण्याची सूचना

अधिकाऱ्यांनी बोअरवेलच्या दूषित पाण्यामुळेच धोका निर्माण झाल्याचा दाट संशय व्यक्त करून पाण्याचे नमूने तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेतून येईपर्यंत सदर पाणीपुरवठा बंद करण्याची सूचना केली. शिवाय स्विमिंग पूल परिसर आणि जलवाहिनीसह अतिरिक्त नमुनेदेखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाला पाणीपुरवठा वाहिन्यांची तपासणी करण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य पथके घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी या समस्येत लक्ष घातलेले असून ते पाठपुरावा करीत आहेत.

दरम्यान, प्रभू व्हायोलेटा या वसाहतीत निर्माण झालेल्या प्रकारला पूर्णपणे संबंधीत बिल्डर जबाबदार असल्याचा आरोप या वसाहतीतील रहिवाशांनी केला आहे. वसाहतीतील धोक्यांची कल्पना वेळोवेळी बिल्डरला देण्यात आलेली आहे. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही असा दावा त्यांनी केला आहे.आता सरकारने आणि त्यांच्या आरोग्य खात्यानेच या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हाला या संकटातून मुक्त करावे, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. वसाहतीतील सांडपाणी प्रकल्पही योग्यपद्धतीने चालत नाही अशी तक्रारही लोकांनी केली आहे.

प्रभू व्हायलेटाचे बिल्डर अमित प्रभू यांनी वसाहतीतील रहिवाशांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. सध्या घडलेल्या प्रकाराची तक्रार आपल्याकडे एकाही नागारिकाने केलेली नाही. माध्यमांद्वारे आपल्याला ही माहिती मिळाली. त्यानंतर आपण खबरदारी म्हणून उपाययोजना हाती घेतल्या. वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यपद्धतीने चाललेले आहेत. त्या पाण्याचा वापर झाडांसाठी होत आहे. तसेच वसाहतीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणीपुरवठा विभागाची आहे. त्यासाठी वेगळ्या टाक्या आहेत. तसेच इतर वापरासाठी बोअरवेलचे पाणीही वेगळ्या टाक्यांद्वारे उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे वसाहतीतील पाणी दूषित झाले आहे हा संशय साफ चुकीचा असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे. बोअरवेलचे टाक्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत. संशयास्पद काही आढळून आलेले नाही. तसेच नागरिकांसाठी सध्या टँकरचे पाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे. सर्व आवश्यक काळजी घेण्यात येत आहे असे स्पष्ट करून वसाहतीची सोसायटी स्थापन होत नाही याला फ्लॅटमालक रहिवासीच जबादार असल्याचा दावा प्रभू यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.