रायपूरमध्ये आढळून आली नोटांनी भरलेली कार
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये ईडीच्या छाप्यानंतर पोलिसांनी नोटांनी भरलेली एक कार ताब्यात घेतली आहे. कारमध्ये 500, 200 आणि 100 च्या नोटांच्या बंडलांना ठेवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या कारमध्ये एकूण 1.5 कोटी रुपये होते असे मोजणीनंतर स्पष्ट झाले. ही रक्कम कुणाची होती आणि कुठे नेण्यात येत होती याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
तत्पूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते. ईडीने भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होत आहे. ईडीने छाप्यांदरम्यान सुमारे 30 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. तर छाप्यानंतर बाहेर पडणाऱ्या ईडीच्या वाहनावर बघेल समर्थकांनी हल्ला केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.