खासगी सावकाराकडून 146 तोळे दागिने हस्तगत
सातारा :
खासगी सावकाराकडे सोन्याचे दागिने व फ्लॅट तारण ठेवत घेतलेली रक्कम मुद्दल व व्याजासहित परत केली तरीही खासगी सावकार दागिने परत देत नसल्याने याप्रकरणी सावकाराविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात मनोज गणपती महापरळे, शकुंतला अशोक शिंदे (मयत) यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच या सावकारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांना यश आले आहे. या सावकाराकडून 1 कोटी 16 लाख 80 हजाराचे 146 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी, अजिंक्य अनिल चौधरी अशी त्यांची नावे आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक शेख म्हणाले, फिर्यादी मनोज गणपती महापरळे यांनी आरोपी विजय वसंतराव चौधरी, कल्पना विजय चौधरी, अजिंक्य अनिल चौधरी यांच्याकडून 2018 सालापासून वेळोवेळी एकूण 1 कोटी 92 लाख रुपये रक्कम प्रथम 2.5 टक्के दराने रक्कम घेतली. नंतर वाढवून 10 टक्के व्याज दराने घेतली होती, त्या रकमेसाठी महापरळे व शिंदे यांच्याकडून 65 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 50 लाख रुपये किमतीचा फ्लॅट तारण ठेवून घेतला होता. महापरळे यांनी सन 2018 ते 2023 दरम्यान विजय व कल्पना चौधरी यांना मुद्दल रुपये 1 कोटी 92 लाख व व्याज रुपये 1 कोटी 12 लाख 77 हजार 500 असे एकूण रुपये 3 कोटी 04 लाख 77 हजार 500 दिली. तरी देखील तारण ठेवलेले 65 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व फ्लॅट परत दिला नाही. याप्रकरणी महापरळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खासगी सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
तसेच फिर्यादी शकुंतला अशोक शिंदे (मयत) यांनी आरोपी विजय चौधरी यांच्याकडून वेळोवेळी रुपये 19 लाख 98 हजार प्रथम 2.5 टक्के व ती वाढवून 10 टक्के व्याज दराने घेतली होती, त्या रकमेस तारण म्हणून आरोपी चौधरीने फिर्यादी शिंदे यांच्याकडून 81 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ठेवून घेतले होते. शिंदे यांनी सन 2018 ते 2023 दरम्यान चौधरीला व्याजासहित 20 लाख 48 हजार 931 रुपये वेळोवेळी देवूनही त्यांचे 81 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांना परत केले नाहीत. यामुळे त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खासगी सावकारी व फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे अरूण देवकर, आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर उपअधीक्षक आश्लेषा हुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक
शिवाजी भोसले यांनी स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मदतीने गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला. साक्षीदार यांच्याकडे सखोल तपास करुन आरोपींच्या विरुध्द सबळ पुरावा प्राप्त केला. व दोन्ही गुन्ह्यातील खासगी सावकार आरोपी चौधरीकडे असणारे महापरळे व शिंदे यांचे एकूण 146 तोळे वजनाचे चालू बाजारभावाप्रमाणे 1 कोटी 16 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
प्रभारी व तपास अधिकाऱ्यांची होणार चौकशी खासगी सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही तपासात दिरंगाई करण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्यास प्रभारी व तपास अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश देण्याचे पोलीस अधीक्षक शेख यांनी सांगितले..