नेपाळमध्ये भूकंपामुळे 143 जणांचा मृत्यू
अनेक घरांची पडझड, मालमत्तेची हानी, मदतकार्य गतिमान : मध्यरात्री झालेल्या आपत्तीने मोठी जीवितहानी
वृत्तसंस्था/ काठमांडू
पश्चिम नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपूर्वी झालेल्या विनाशकारी 6.4 तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या शनिवारपर्यंत 143 वर पोहोचली आहे. या भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक सरकार, सुरक्षा यंत्रणा, राजकीय पक्ष आणि स्थानिक तऊण मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत. या भूकंपामुळे नेपाळमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाली प्रांतातील जाजरकोट आणि पश्चिम ऊकुम जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली आहे. तर जखमींचा आकडा हजारपर्यंत असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी शनिवारी भूकंपप्रभावित क्षेत्रांचा दौरा करतानाच आपत्तीग्रस्तांसाठी सरकारतर्फे निधीची घोषणाही केली.
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 11:47 वाजता 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. मध्यरात्रीपूर्वी झालेल्या या भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे 227 किमी उत्तरेस आणि काठमांडूपासून 331 किमी अंतरावर 10 किमी खोलीवर होता. नेपाळमध्ये महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे.
उपमहापौर सरिता सिंह यांचा मृत्यू
नेपाळमधील जाजरकोट भूकंपात नलगड नगरपालिकेच्या उपमहापौर सरिता सिंह यांचाही बळी गेला आहे. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम नेपाळमधील जाजरकोट होता. नेपाळमधील जाजरकोटमध्ये झालेल्या भूकंपाची छायाचित्रे समोर आली आहेत. नेपाळमध्ये मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राचे प्रमुख लोकविजय अधिकारी यांनी सांगितले. जखमींवरील उपचारासाठी सरकारने नेपाळचे भेरी हॉस्पिटल, कोहलपूर मेडिकल कॉलेज, नेपाळगंज मिलिटरी हॉस्पिटल आणि पोलीस हॉस्पिटल येथे विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
10 कोटींचा मदतनिधी
भूकंपग्रस्त जाजरकोट आणि पश्चिम ऊकुम जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचावकार्याला गती देण्यासाठी नेपाळ सरकारने 10 कोटी ऊपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. शनिवारी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री नारायण काझी श्रेष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विविध मंत्रालये आणि सुरक्षा यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
भारतातही भूकंपाचे धक्के
नेपाळमधील भूकंपाचा परिणाम नेपाळला लागून असलेल्या भारतातील अनेक भागातही जाणवला आहे. मात्र, कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. बिहार आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणा, कटिहार, पूर्व चंपारण, दरभंगा, मुझफ्फरपूर, पश्चिम चंपारण, सासाराम, नवादा आणि भारत-नेपाळ सीमेवरील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तर उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांमध्येही धक्के जाणवले.