जांबोटी रस्त्यावर १४ हजार लिटर स्पिरीट जप्त
अबकारी खात्याची कारवाई : वाहनासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनचालक ताब्यात
खानापूर : बेळगाव-जांबोटी रस्त्यावर मंगळवारी पहाटे 3.45 वाजता अबकारी खात्याच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत विनापरवाना गोव्याकडे वाहतूक करत असलेला स्पिरीटचा टँकर ताब्यात घेतला. चौकशी केली असता 14 हजार लिटर स्पिरीट गोव्याकडे नेण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर टँकर आणि स्पिरीटसह 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा अबकारी खाते पुढील तपास करत आहे. याबाबत अबकारी खात्याकडून मिळालेली माहिती अशी की, बेळगाव-कणकुंबी रस्त्यावर मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती बेळगाव डीसीए खात्याला मिळाली होती.
त्यानुसार जांबोटी-कणकुंबी रस्त्यावर विशेष सापळा रचण्यात आला होता. याचवेळी बेळगावहून गोव्याकडे जात असलेला टँकर क्रमांक केए 22-बी-3793 ची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर अबकारी खात्याचे निरीक्षक सुनील पाटील यांना संशय आला. टँकर ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता टँकरमध्ये विनापरवाना गोव्याकडे नेण्यात येत असलेले 14 हजार लिटर स्पिरीट आढळून आले. सदर टँकर खानापूर अबकारी कार्यालयात आणून चौकशी केली असता तेलाची वाहतूक करण्याचे भासवून स्पिरीटची वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत टँकरसह 14 हजार लिटर शुद्ध स्पिरीट जप्त करण्यात आले असून 14 लाख रुपयाचे स्पिरीट आणि 21 लाखाचे वाहन असा एकूण 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक आणि मालक सिद्धराज पुट्टास्वामी शेट्टी (वय 47) राहणार नंजनगुड जिल्हा म्हैसूर याला अटक करून त्याच्यावर बीएनएस 35 (3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत अतिरिक्त अबकारी आयुक्त डॉ. वाय मंजुनाथ, एफ. एच. चलवादी, उपायुक्त जगदीश एन. के, निरीक्षक आर. एन. मुरगोड, मंजुनाथ मल्लीगेरी, नुरुल्ला खान, मल्लेशी उप्पार, विजयकुमार हिरेमठ, रवि एम. मुरगोड, सुनील एस. पाटील, मंजुनाथ बळगप्पन्नावर यांसह इतर अबकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
अशीही शक्कल
खाद्यतेलाची वाहतूक करण्यात येत असल्याचे भासविले होते. यासाठी टँकरवर लक्ष्मी ऑईल कॅरिअर असे चार ठिकाणी लिहिण्यात आले आहे. तसेच टँकरसोबत राईस बर्न ऑईलचे बिल लावण्यात आले होते. तसेच टँकरच्या वरील तीन टोपण्यांच्या ठिकाणी सहा इंच व्यासाचे लोखंडी पाईप नटबोल्टने टँकरमध्ये बसविण्यात आले होते. त्या पाईपमध्ये खाद्यतेल टाकण्यात आले होते. जर कोणी संशयाने वरील टोपन काढून तपासणी केली असता तेल वाहतूक होत असल्याचे दिसून यावे, यासाठी ही शक्कल लढविण्यात आली होती. तसेच टँकरच्या तेल खाली करण्याच्या ठिकाणी पाईपाना जसे कंपनीचे अधिकृत सिल असते, त्याप्रमाणे सिल करून त्यावर शिक्का मारण्यात आला होता. जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये.
अबकारी खात्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता चालकाने चेन्नई येथील राईस बर्न ऑईल कंपनीचे बिल दाखविले. या बिलावर चेन्नई ते फेंडा अशा वाहतुकीचा परवाना असलेले बिल होते. मात्र बिलावर तारखेच्या ठिकाणी खाडाखोड करण्यात आल्याने सुनील पाटील यांना संशय आला. त्यांनी टँकरवर हात ठेवून तपासणी केली असता टँकर एकदम थंडगार लागल्याने त्यांचा संशय बळावला. त्यावेळी सुनील पाटील यांनी चालकाची झडती घेतली. त्यावेळी चालकाने टँकरमध्ये स्पिरीट असल्याचे कबूल केल्याने 14 हजार लिटर स्पिरीट वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले.
गोव्यात अनेकवेळा स्पिरीटची वाहतूक?
टँकरच्या तपासणीत अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना तेल वाहतुकीची इतरही बिले हाती लागली आहेत. यामुळे यापूर्वीही या टँकरने गोव्यात अनेकवेळा स्पिरीटची वाहतूक केल्याचा संशय अबकारी खात्याने व्यक्त केला असून याबाबत अबकारी खाते कसून चौकशी करत आहेत.