मनपाकडून 140 किलो प्लास्टिक जप्त
दहा हजार रुपये दंड वसूल, पुन्हा प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र
प्रतिनिधी/ बेळगाव
प्लास्टिक विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम राबविण्यामध्ये सातत्य दिसून येत नाही. शुक्रवारी जुना पी. बी. रोड, बसस्टँड रोड या परिसरात महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम राबविली. त्याठिकाणी 140 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. जवळपास दहा हजार रुपये दंडही जमा करण्यात आला असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी दिली.
प्लास्टिकमुळे पर्यावरण खराब होत आहे. केंद्र सरकारने याबाबत प्लास्टिक विरोधात मोहीम राबविण्यासाठी महानगरपालिकांना सूचना केल्या आहेत. मात्र, प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करूनच ही मोहीम राबविणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली होती. महानगरपालिकेमध्ये 20 कोटींचे प्रकरण तापल्यामुळे अधिकारी त्यामध्येच गुंतून होते. मात्र, त्यानंतर शुक्रवारी अचानकपणे ही मोहीम राबविण्यात आली.
मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आरोग्य विभागातील व पर्यावरण विभागातील कर्मचारी, अभियंते आदिलखान पठाण यांनी राबविली आहे. यापुढेही मोहीम राबविली जाईल, असे त्यांनी सांगितले.